देशांतर्गत क्रिकेटमधील महत्वाची मानली जाणारी रणजी ट्रॉफी स्पर्धा आता अधिक रंजक बनत चालली आहे. झारखंड आणि नागालंड यांच्यात स्पर्धेचा उप उपांत्यपूर्व सामना १२ मार्चपासून खेळला जात आहे. कोलकातामध्ये हा सामना खेळला जात असून झारखंड संघाने पहिल्या डावात तुफानी प्रदर्शन केले आहे. झारखंडचा युवा खेळाडू कुमार कुशाग्रने पहिल्या डावात संघासाठी द्विशतकी खेळी केली आणि इतिहास रचला आहे.
कुमार कुशाग्र (Kumar Kushagra) हा झारखंड संघाचा १७ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज आहे. त्याने नागालंडविरुद्धच्या या महत्वाच्या सामन्यात २७० चेंडू खेळले आणि २६६ धावा केल्या. यादरम्यान त्याने ३७ चौकार आणि २ षटकारही ठोकले आहेत. सामन्याच्या पहिल्या दिवशी कुशाग्र खेळपट्टीवर नाबाद टिकून राहिला आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी त्याने स्वतःची विकेट गमावली.
प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे त्याचे पहिलेच द्विशतक ठरले आहे. २०२२ साली तो १९ वर्षाखालील संघाचा भाग होता. झारखंड संघासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वात मोठी खेळी करण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
हेही वाचा- कोण आहे रणजी ट्रॉफीत २६६ धावा कुटणारा झारखंडचा पठ्ठ्या? पाकिस्तानी दिग्गजालाही ठरलाय वरचढ
कुशाग्र आला दुसऱ्या स्थानी
भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) याने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात झारखंड संघातून केली होती. ईशानच्या नावावर झारखंडसाठी केलेली सर्वात मोठी खेळी आहे. त्याने २०१६ मध्ये दिल्ली संघाविरुद्ध २७३ धावांची खेळी केली होती. कुशाग्र आता या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
कुशाग्रव्यतिरिक्त झारखंडच्या २ फलंदाजांचे शतक
कुशाग्रव्यतिरिक्त झारखंडच्या इतरही खेळाडूंनी अप्रतिम प्रदर्शन केले आहे. शहाबाज नदीमने पहिल्या डावात झारखंडसाठी १७७ धावांची मोठी खेळी केली. तसेच विराट सिंगने १०७ धावांचे योगदान दिले. नदीम आणि कुशाग्रने ७ व्या विकेटसाठी १६६ धावांची महत्वाची भागीदारी पार पाडली.
झारखंडचा संघ भक्कम स्थितीत
दरम्यान सामन्याचा विचार केला तर, पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत झारखंड संघाने ५ विकेट्सच्या नुकसानावर ४०२ धावा केल्या होत्या. त्यावेळी कुमार कुशाग्र ११२ धावांसह खेळपट्टीवर कायम होता आणि त्याच्या सोबत अंकूश रॉयने नबाद २१ धावा केल्या होता. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तरी, झारखंडचा पहिला डाव मात्र संपलेला नव्हता. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत संघाने ९ विकेट्सच्या नुकसानावर ७६९ धावा केल्या होत्या. यावेळी शाहबाज नदीम (१२३*) आणि राहुल शुक्ला (२९*) खेळपट्टीवर कायम होते. तिसऱ्या दिवसी झारखंड संघ ८८० धावांवर सर्वबाद झाला
झारखंड संघ सामन्यात भक्कम स्थितीत दिसत आहे. पहिल्या डावात मोठी धावसंख्या साकारल्यानंतर प्रत्युत्तरात आलेला नागालंड संघ एवढ्या धावा करेल, याची खूपच कमी शक्यता आहे. नागालंडने तिसऱ्या दिवशी ५० धावांच्या आतमध्ये संघाच्या तीन महत्वाच्या विकेट्स गमावल्या.
महत्वाच्या बातम्या –
‘प्रेम केसांमध्ये आहे’, गुलाबी रंगात केस रंगवत हेटमायरनं राजस्थान रॉयल्सच्या चाहत्यांचं जिंकलं काळीज
महान भारतीय कर्णधारही बळींचा पंचक घेणाऱ्या बुमराहच्या गोलंदाजीच्या प्रेमात; म्हणाले, ‘एवढी प्रतिभा…’
भारताचा ‘तोडफोड’ फलंदाज! बंगळुरू कसोटीत २८ चेंडूत अर्धशतक करणाऱ्या पंतवर कौतुकाचा वर्षाव