मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सध्या विदर्भ आणि मुंबई यांच्यात रणजी ट्रॉफी 2023-24 चा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात मुंबईचा विदर्भावर वरचष्मा असल्याचं दिसतंय. चौथ्या डावात मुंबईनं विदर्भाला विजयासाठी 538 धावांचं लक्ष्य दिलं. प्रत्युत्तरात, आज चौथ्या दिवसअखेर विदर्भाची धावसंख्या 5 गडी बाद 248 आहे. त्यांना विजयासाठी आणखी 290 धावांची आवश्यकता आहे.
उद्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी काहीही होऊ शकतं. मुंबईला विजयासाठी केवळ 5 विकेट्सची आवश्यकता आहे. मात्र विदर्भानं आज ज्याप्रकारे चिवट फलंदाजी केली, ते पाहता हे करणं एवढंही सोपं नाही. अशा स्थितीत हा सामना अनिर्णित राहू शकतो. मात्र असं झाल्यास मुंबई संघासाठी हे फायद्याचं ठरेल.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईची टीम 42व्यांदा रणजी विजेतेपद पटकावण्याच्या जवळ आहे. सामना अनिर्णित राहिला तरी मुंबई संघ चॅम्पियन होईल. रणजी ट्रॉफीच्या नियमांनुसार, सामना अनिर्णित राहिल्यास पहिल्या डावात आघाडीवर असलेला संघ चॅम्पियन होतो. मुंबईनं पहिल्या डावात 224 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात विदर्भाचा संघ 105 धावांवर बाद झाला. अशाप्रकारे मुंबईला 119 धावांची आघाडी मिळाली होती. मुंबईनं दुसऱ्या डावात 418 धावा केल्या.
रणजी ट्रॉफीच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याच टीमला 380 पेक्षा जास्त धावांचं लक्ष्य गाठता आलेलं नाही. 350 वरील स्कोअरचा 5 वेळा पाठलाग करण्यात आला आहे. तर 370 च्या वरचं लक्ष्य तीनदा गाठलं आहे. सर्वात मोठा यशस्वी धावांचा पाठलाग रेल्वेच्या नावावर आहे. हा विक्रम त्यांनी याच सीजनमध्ये नोंदवला होता. त्यानी त्रिपुराविरुद्ध 378 धावांचं लक्ष्य गाठलं होतं. यापूर्वी हा विक्रम सौराष्ट्राच्या नावावर होता. त्यांनी 2019-20 मध्ये 372 धावांचं टारगेट चेज केलं होतं.
रणजी ट्रॉफीमधील सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग
रेल्वे – 378/5, विरुद्ध त्रिपुरा – 2023-24
सौराष्ट्र – 372/4, विरुद्ध उत्तर प्रदेश – 2019-20
आसाम – 371/4, विरुद्ध सैन्य दल – 2008-09
राजस्थान – 360/4, विरुद्ध विदर्भ – 1989-90
उत्तर प्रदेश – 359/4, विरुद्ध महाराष्ट्र – 2021-22
महत्त्वाच्या बातम्या-
‘मिरॅकल मॅन’! अपघातानंतर ऋषभ पंतच्या कमबॅकवर बीसीसीआयची डॉक्युमेंट्री, ‘या’ तारखेला होणार रिलीज
रमजानचा उपवास सोडण्यासाठी क्रिकेट मॅच थांबवली, खेळाडूंनी मैदानावरच खाल्ला खजूर