---Advertisement---

रणजी ट्रॉफी विजेत्या जम्मू-काश्मीरवर पैशांचा वर्षाव! बीसीसीआय आणि सरकारकडून मिळणार ‘इतके’ कोटी

On: शनिवार, फेब्रुवारी 28, 2026 5:20 PM
---Advertisement---

जम्मू-काश्मीर क्रिकेटसाठी २८ फेब्रुवारी २०२६चा दिवस अविस्मरणीय ठरला आहे. त्यांनी यावर्षीचे रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आणि त्यांच्या ६७ वर्षांची प्रतिक्षा संपली. या हंगामात त्यांनी प्रथमच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यांनी अंतिम सामन्यात ८ वेळेचा रणजी ट्रॉफी विजेता कर्नाटकला चांगलीच टक्कर दिली. हा सामना सुरू होण्याआधी कर्नाटकचे फलंदाज विरुद्ध जम्मू-काश्मीरचे गोलंदाज अशा चर्चा सुरू होत्या, मात्र जम्मू-काश्मीर गोलंदाजीबरोबर फलंदाजीतही सरस निघाला. त्यांच्या या विजयामुळे जम्मू-काश्मीरचे सरकार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मोठी बक्षिस रक्कम जाहीर केली आहे.

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या कार्यालयाने त्यांच्या एक्स अकाउंटवरून संघाचे अभिनंदन केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले, ” ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल जम्मू-काश्मीर संघाचे अभिनंदन करताना, मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकवर त्यांच्याच घरच्या मैदानावर विजय मिळवल्यानंतर खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना २ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करत आहे.”

जम्मू-काश्मीरचा हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी अब्दुल्ला यांनीही मैदानावर उपस्थिती दर्शवली होती.

या सामन्यात जम्मू-काश्मीरचा कर्णधार पारस डोग्राने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी पहिल्या डावात सर्व विकेट्स गमावत ५८४ धावा केल्या. प्रत्युत्तरात कर्नाटक पहिल्या डावात २९२ धावसंख्येपर्यंतच मजल मारू शकला. त्यामध्ये कर्नाटकचा सलामीवीर मयंक अग्रवालने १६० धावांची खेळी केली, मात्र त्यांचे काही फलंदाज जम्मू-काश्मीरच्या गोलंदाजीसमोर टीकले नाही. त्यात जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबीने ५ विकेट्स घेतल्या. यामुळे जम्मू-काश्मीरला २९१ धावांची आघाडी मिळाली. त्यामध्ये दुसऱ्या डावात उत्तम फलंदाजी करत भर टाकली.

जम्मू-काश्मीरने दुसऱ्या डावात सामन्याच्या शेवटच्या दिवशी ४ विकेट्स गमावत ३४२ धावा केल्या होत्या. यामुळे त्यांनी मोठी आघाडी घेत विजेतेपद मिळवले. जम्मू-काश्मीर १९५९-६०मध्ये पहिल्यांदा रणजी ट्रॉफीमध्ये खेळला होता. आता त्यांनी ६७ वर्षानंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचत विजेतेपद मिळवले.

बीसीसीआयकडून विजेत्या संघाला ५ कोटी रुपयांचे बक्षिस मिळणार आहे. तसेच उपविजेत्या संघाला ३ कोटी रुपये मिळणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---