---Advertisement---

पुजाराच्या वडिलांकडून फलंदाजी शिकणारा ‘हा’ खेळाडू रणजी फायनलमध्ये चमकला

On: बुधवार, मार्च 11, 2020 5:47 PM
---Advertisement---

9 मार्चपासून रणजी ट्रॉफीतील (Ranji Trophy) अंतिम सामना सौराष्ट्र विरुद्ध बंगाल संघात (Saurashtra vs Bengal) सुरु झाला आहे. या सामन्यात सौराष्ट्र संघाचा फलंदाज अर्पित वसावदा (Arpit Vasavada) आणि स्टार फलंदाज चेतेश्वर (Cheteshwar Pujara) पुजाराच्या शानदार कामगिरीमुळे संघाला पहिल्या डावात सर्वबाद 425 धावांची मजल मारता आली.

यावेळी अर्पितने सर्वाधिक 106 आणि पुजाराने 66 धावा केल्या. या दोन्ही खेळाडूंच्या भागीदारीमुळे संघाने बंगालपुढे भला मोठा धावांचा आकडा उभा केला आहे. अर्पितचे हे सलग दुसरे शतक आहे. यापूर्वी त्याने गुजरातविरुद्ध उपांत्य सामन्यात शतकी खेळी केली होती.

अंतिम सामन्यात शतकी खेळीनंतर पुजाराबद्दल बोलताना अर्पित म्हणाला की, “आम्ही दोघे अनेक वर्षांपासून सोबत खेळत आहोत. सामन्याच्या एक दिवसापूर्वी पुजाराची तब्येत ठीक नव्हती. तेव्हा माझ्या मनात आले की तो आज फलंदाजी करण्यासाठी उतरेल. मला थकवा न लागो आणि मी त्याच्याबरोबर खेळत रहावे, असे मला वाटत होते.”

सामन्याच्या एक दिवसापूर्वी पुजाराला डिहायड्रेशन आणि घसा खवखवत असल्यामुळे विश्रांती घ्यावी लागली होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो फलंदाजीला आला तेव्हा त्याने आपल्या शैलीत फलंदाजी केली. यावेळी पुजाराने 237 चेंडूचा सामना करत 66 धावांची खेळी केली.

अर्पित यावेळी म्हणाला की, पुजाराबरोबर फलंदाजी करून फायदा झाला. वेळोवेळी खेळपट्टीवर काय केले पाहिजे आणि कोणत्या चेंडूपासून सावधगिरी बाळगली पाहिजे, हे पुजारा वेळोवेळी सांगत होता. फलंदाजीदरम्यान आमचे ध्येय हेच होते की, आम्ही बचावात्मक खेळी करावी आणि बंगालच्या गोलंदाजांना दमवण्याचा प्रयत्न करावा.

“आम्ही चांगली फलंदाजी केली. फलंदाजीसाठी ही सोपी खेळपट्टी नाही. आता आमच्याकडे धावफलकावर भरपूर धावा आहेत. त्यामुळे आम्ही मजबूत स्थितीत आहोत,” असे अर्पित म्हणाला.

अर्पितला दुसऱ्या दिवशीच्या त्याच्या रणनीतीबद्दल विचारले असता तो म्हणाला की, “आम्हाला जेवढं शक्य होईल तितकी फक्त जास्तीत जास्त फलंदाजी करायची होती. याठिकाणी खेळपट्टीवर टिकून राहणे महत्त्वाचे होते.”

आपल्याला फलंदाजी कोणी शिकवली याबद्दल सांगताना अर्पित म्हणाला की, “मला पुजाराच्या वडिलांनी फलंदाजी शिकवली आहे.”

अर्पितसाठी हा प्रथम श्रेणी क्रिकेटचा मोसम शानदार राहिला. त्याने रणजी ट्रॉफीच्या या मोसमात 4 शतके केली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

…म्हणून सेहवाग म्हणतो सचिन तेंडूलकरने थकवले!!!

कोरोना व्हायरसमुळे आरसीबीसह आयपीएलला बसणार मोठा धक्का!!

हार्दिक पंड्या तब्बल ६ महिन्यांनंतर पुनरागमनासाठी सज्ज, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---