---Advertisement---

पृथ्वी शॉ समोरील संकट वाढले, टीम इंडियातील पुनरागमन लांबणार?

On: शनिवार, जानेवारी 4, 2020 1:52 PM
---Advertisement---

भारतात सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत चौथ्या फेरीत मुंबईचा सामना कर्नाटक संघाविरुद्ध होत आहे. मात्र या सामन्याच्या पहिल्याच दिवशी, शुक्रवारी (3 जानेवारी) मुंबईचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉला खांद्याची दुखापत झाल्याने मोठा धक्का बसला आहे.

विशेष म्हणजे शॉचा न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय अ संघात समावेश आहे. भारतीय अ संघ 10 जानेवारीला न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय अ संघ न्यूझीलंड अ संघाविरुद्ध 3 वनडे आणि 2 चार दिवसीय कसोटी सामने खेळणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी 20 वर्षीय पृथ्वी शॉची भारतीय अ संघात निवड झाली आहे.

पण त्याआधीच त्याला दुखापत झाल्याने आता त्याच्या समोरील समस्या वाढल्या आहेत.

त्याला शुक्रवारी कर्नाटक विरुद्ध तिसऱ्या सत्रात क्षेत्ररक्षण करत असताना ही दुखापत झाली. त्याने ओव्हरथ्रो आडवण्यासाठी उडी मारली असताना त्याच्या खांद्याला दुखापत झाली. या दुखापतीनंतर लगेचच तो मैदानाबाहेर गेला.

शुक्रवारच्या खेळानंतर मुंबईचा कर्णधार सुर्यकुमार यादवने म्हटले आहे की सध्या शॉ बरा दिसत आहे.

तो पत्रकारांशी बोलताना म्हणाला, ‘तो सध्या बरा दिसत आहे. तो मैदानात असताना ठिक नव्हता. पण आत्ता तो ठिक आहे. नंतर फिजिओला विचारल्यानंतर आम्हाला त्याच्या दुखापतीची नक्की काय स्थिती आहे, हे समजेल.’

याबरोबरच शॉचे एमआरआय स्कॅनही करण्यात आले आहे.

या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी केली होती. मात्र त्यांचा पहिला डाव 194 धावांवरच संपुष्टात आला होता. मुंबईकडून शॉला फलंदाजी करताना पहिल्या डावात 29 धावाच करता आल्या. मुंबईकडून यादवने 77 धावांची अर्धशतकी खेळी केली.

त्यानंतर कर्नाटकचा पहिला डाव 218 धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे कर्नाटकने 24 धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात मुंबईकडून शॉ सलामीला फलंदाजी करण्यासाठी आलेला नाही. त्याच्या ऐवजी आदित्य तरेबरोबर अजिंक्य रहाणेने मुंबईच्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---