आयर्लंड विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना उत्तर आयर्लंडमधील ब्रेडी क्रिकेट क्लबवर खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तानने आयर्लंडचा 92 धावांनी पराभव केला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. अफगाणिस्तानच्या विजयात स्टार लेग-स्पिनर राशिद खानने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने सहा बळी घेतले. ज्यामध्ये एक महत्त्वपूर्ण विक्रमही नोंदवला.
पावसामुळे सामन्यातील षटकांची संख्या कमी करून ती प्रति संघ 47 षटके करण्यात आली. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 8 बाद 299 धावा केल्या. प्रत्युत्तरात, आयर्लंडचा संपूर्ण संघ 207 धावांत बाद झाला.
उत्कृष्ट गोलंदाजी करत राशिद खानने 7.4 षटकांत केवळ 34 धावा देऊन सहा बळी घेतले. एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची ही सहा बळी घेण्याची तिसरी वेळ ठरली.
या कामगिरीसह, राशिदने एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा सहा बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चमिंडा वास, ट्रेंट बोल्ट आणि इम्रान ताहिर यांना मागे टाकले. या तिघांनीही ही कामगिरी प्रत्येकी दोनदा केली आहे.
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनिस या यादीत अव्वल स्थानावर आहे, ज्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत पाच वेळा एका डावात सहा बळी घेतले आहेत.
300 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. केड कारमायकल वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.
एका बाजूने किल्ला लढवत कारमायकलने 66 चेंडूंत 62 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याव्यतिरिक्त, अँडी बालबर्नीने 36 धावा, बेन व्हाईटने 27 धावा, तर कर्टिस कॅम्फर आणि लॉर्कन टकर यांनी प्रत्येकी 23 धावा केल्या. मात्र, संघाला विजय मिळवून देण्यासाठी हे प्रयत्न पुरेसे ठरले नाहीत.
या सामन्यात अफगाणिस्तानच्या फलंदाजांनीही दमदार कामगिरी केली. इब्राहिम झद्रानने शानदार फलंदाजी करत संघासाठी सर्वाधिक 84 धावा केल्या. त्याला सेदिकुल्ला अटलची मोलाची साथ मिळाली, ज्याने 45 धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त, हशमतुल्ला शाहिदी (36), रहमानुल्ला गुरबाज (32), रहमत शाह (30) आणि अजमतुल्ला ओमरझाई यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले.
आयर्लंडकडून मार्क अडायर आणि जे मुंद्रा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर गॅव्हिन होय, हॅरी टेक्टर आणि कर्टिस कॅम्फर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.






