अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका संघात शारजाहच्या मैदानावर झालेला आशिया चषक 2022 मधील सुपर-4 चा पहिला सामना अतिशय रोमांचक राहिला. या सामन्यात विजयाचा नारळ फोडण्यासाठी दोन्ही संघांनी शेवटपर्यंत चिवट झुंज दिली. अखेर श्रीलंकेने सांघिक कामगिरीच्या जोरावर 5 चेंडू राखून 4 विकेट्सने सामना जिंकला. या सामन्यादरम्यान अफगाणिस्तान आणि श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये वाद झाला. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अफगाणिस्तानचा (AFGvsSL) फिरकीपटू राशिद खान (Rashid Khan) याचे त्याच्या भावनांवरील नियंत्रण सुटले आणि तो श्रीलंकेचा फलंदाज दनुष्का गुणथिलका (Danushka Gunathilaka) याच्या अंगावर धावून गेला. अखेर खेळाडूंनी आणि पंचांनी मध्यस्थी केल्याने हा वाद निवळला.
अफगाणिस्तानच्या 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुणथिलका चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. श्रीलंकेच्या डावातील 17 वे षटक अफगाणिस्तानकडून राशिद टाकायला आला होता. त्याच्या या षटकातील पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेचा स्टार फलंदाज गुणथिलकाने खणखणीत रिव्हर्स स्वीप मारत चेंडू चौकारासाठी पाठवला. आपल्या षटकाची सुरुवातच चौकाराने झाल्याने पाहून राशिद चिडला.
https://twitter.com/MohitKu38157375/status/1566115109067698176?s=20&t=DoaEa8E9GiJI21GjQ_-4XA
त्याचे स्वतच्या भावनांवरील नियंत्रण सुटले आणि तो गुणथिलकाच्या अंगावर धावून गेला. तो गुणथिलकाजवळ जाऊन त्याला काहीतरी बोलू लागला. गुणथिलकानेही त्याचा सामना केला. मात्र फलंदाज भानुका राजपक्षेने त्वरित मध्यस्थी करत राशिदला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि दोघांनीही लगेच माघार घेतली.
https://twitter.com/Its_Qasimm/status/1566120888428556289?s=20&t=yuFi541jtY1ARvmSUUz1Kg
राशिद खानने घेतला सूड
मात्र इतक्यावरच राशिद शांत बसणार नव्हता. गुणथिलकाकडून चौकार खाल्यानंतर राशिदने चौथ्या चेंडूवर त्याच्या थेट बत्त्या गुल केल्या. षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने गुणथिलकाला त्रिफळाचीत केले. गुणथिलका 20 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 33 धावा करून बाद झाला.
असा राहिला सामना
दरम्यान या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने निर्धारित 20 षटकात 6 बाद 175 धावा केल्या. या डावात अफगाणिस्तानकडून रहमनुल्लाह गुरबाजने सर्वाधिक 84 धावा केल्या. 45 चेंडूत 6 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने त्याने ही शानदार खेळी केली. तसेच इब्राहिन झारदानने 40 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात श्रीलंका संघाकडून पथुम निसांका (35 धावा), कुसल मेंडिस (36 धावा), दनुष्का गुणथिलका (33 धावा) आणि भानुका राजपक्षे (31 धावा) यांच्या खेळींच्या जोरावर श्रीलंकेने 19.1 षटकातच सामना जिंकला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी दिग्गजाला माकडउड्या मारायला लावणाऱ्या ‘किरण मोरें’ची गोष्ट
लिजेंड्स लीगचे संघ जाहीर! सेहवाग-इरफानचे संघ मजबूत; तर भज्जी-गौतीच्या वाट्याला हे दिग्गज
चिपलकट्टी स्मृती आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन ग्रांप्री: बिगरमानांकित दर्शन पुजारी अंतिम फेरीत