आयपीएल 2024 चा 12 वा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तानचा धडाकेबाज फिरकी गोलंदाज राशिद खाननं गुजरातसाठी एक मोठी कामगिरी केली.
राशिद खान आता गुजरातकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. त्यानं भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा विक्रम मोडला. गुजरातकडून खेळताना राशिदनं 49 बळी घेतले आहेत. तर शमीनं खात्यात 48 बळी आहेत. मोहम्मद शमी दुखापतीमुळे आयपीएलच्या या हंगामातून बाहेर आहे.
गुजरात टायटन्सचा उपकर्णधार राशिद खाननं अहमदाबादच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध चार षटकांत 33 धावा देऊन 1 बळी घेतला. त्यानं 14व्या षटकात दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज हेनरिक क्लासेनला बाद केलं. क्लासेननं 13 चेंडूत 24 धावांची खेळी खेळली. त्याच्या बॅटमधून एक चौकार आणि 2 षटकार आले. नूर अहमदच्या षटकात क्लासेननं दोन षटकार ठोकले पण तो राशिदसमोर संघर्ष करताना दिसला. क्लासेननं चौथ्या विकेटसाठी एडन मार्कराम (17) सोबत 34 धावांची भागीदारी केली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हैदराबादनं निर्धारित 20 षटकात 8 बाद 162 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, गुजरातनं 163 धावांचं लक्ष्य 19.1 षटकांत 3 गडी गमावून गाठलं. गुजरात टायटन्ससाठी इम्पॅक्ट प्लेअर साई सुदर्शननं 36 चेंडूंत 4 चौकार आणि 1 षटकारासह सर्वाधिक 45 धावा केल्या. तर डेव्हिड मिलरनं 27 चेंडूत 44 धावांची नाबाद खेळी केली. मिलरनं आपल्या खेळीत चार चौकार आणि दोन षटकार मारले.
हैदराबादकडून अभिषेक शर्मानं 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 29 धावा केल्या. अब्दुल समदनंही 29 धावांचं योगदान दिलं. हेन्रिक क्लासेननं 24 धावा केल्या. तर एडन मार्करम 17 धावा करून बाद झाला. गुजरात टायटन्सकडून मोहित शर्मानं शानदार गोलंदाजी केली. त्यानं 4 षटकात 25 धावा देत 3 बळी घेतले. तर उमेश यादव, नूर अहमद, उमरझाई आणि राशिद खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
गुजरातनं उडवला हैदराबादचा धुव्वा! 7 गडी राखून शानदार विजय
सनरायझर्स हैदराबाद अडचणीत! मुख्य फिरकी गोलंदाज दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर
वानखेडेवर हार्दिक पांड्याला बूइंग करणाऱ्या चाहत्यांविरुद्ध कारवाई होणार का? एमसीएनं थेटच सांगितलं