रविवारी क्रिकेट जगतात चेंडू छेडछाड प्रकरण गाजत असतानाच दुसरीकडे विश्वचषक पात्रता फेरीचा अंतिम सामना सुरु होता. या सामन्यात अफगाणिस्तानने विंडीज संघावर ७ विकेट्सने सहज विजय मिळवला. याच सामन्यात अफगाणिस्तानचा युवा गोलंदाज रशीद खानने एका मोठ्या विक्रमला गवसणी घातली.
त्याने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० विकेट्स घेण्याचा टप्पा पार केला आहे. त्याने 44 वनडे सामन्यातच 100 विकेट्सचा टप्पा गाठताना अॉस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कचा विक्रम मोडला. याआधी स्टार्कने 52 वनडे सामन्यात 100 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.
राशीदने विंडीजच्या शाय हॉप या यष्टीरक्षक फलंदाजाला बाद करून वनडे कारकिर्दीत १०० विकेटच्या विक्रमला गवसणी घातली.
रशीद खानाला विश्वचषक पात्रता फेरीत सुरवातीच्या काही सामन्यांमध्ये नेतृत्व करण्याचीही संधी मिळाली पण यात त्याला त्याच्या फॉर्मशी झगडावे लागले. पण त्यानंतर अफगाणिस्तानचा नियमित कर्णधार अझघर स्टानिक्झई दुखापतीतून सावरून संघात परतला तेव्हापासून राशिदची गोलंदाजी पुन्हा बहरली.
त्याने आयसीसीच्या विश्वचषक पात्रता फेरीत पहिल्या 5 सामन्यात 8 विकेट्सतर तर नंतरच्या 3 सामन्यात त्याने 9विकेट्स अशा एकूण १७ विकेट्स घेतल्या. तसेच या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या यादीत तो मुजीब रहमान आणि साफयान शरीफ यांच्या बरोबर विभागून १७ विकेट्ससह अव्वल क्रमांकावर आहे.
रशीद खान सध्या यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करत चालला आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच आयसीसीच्या वनडे आणि टी २० च्या गोलंदाजी क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकावला होता. याबरोबरच तो आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे.
वनडेमध्ये सर्वात जलद 100 विकेट्स घेणारे गोलंदाज –
राशिद खान ( अफगानिस्तान ) 44 सामने
मिशेल स्टार्क ( अॉस्ट्रेलिया ) 52 सामने
साक्लेन मूश्ताक ( पाकीस्तान ) 53 सामने
शेन बॉंड ( न्यूझीलंड ) 54 सामने
ब्रेट ली ( अॉस्ट्रेलिया ) 55 सामने