टी२० विश्वचषकातील २४ व्या सामन्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे दोन संघ आमने-सामने होते. पाकिस्तानने या सामन्यातही इतिहास पुन्हा प्रत्यक्षात उतरवला आहे. पाकिस्तान आतापर्यंत एकदाही अफगाणिस्तनकडून पराभूत झाला नसून, या सामन्यातही पाकिस्तानने त्यांची विजय घोडदौड कायम राखली आहे. या सामन्यात पाकिस्तानने पाच विकेट्स राखून विजय विजय मिळवला आहे. हा विजय पाकिस्तान संघाचा टी२० विश्वचषकातील सलग तिसरा विजय ठरला आहे. असे असले तरी, अफगाणिस्तानच्या राशिद खानने मात्र या सामन्यात स्वत:च्या नावावर एक नवीन विक्रमाची नोंद केली आहे.
राशिद खानने या सामन्यात त्याच्या चार षटकांमध्ये २६ धावा दिल्या आणि दोन विकेट्स घेतल्या. राशिदने घेतलेल्या दोन विकेट्सच्या मदतीने त्याने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याच्या १०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. विशेष गोष्ट म्हणजे त्याने हा १०० विकेट्सचा टप्पा सर्वात कमी डावांमध्ये पूर्ण केला आहे.
सर्वात कमी डावात १०० टी-२० विकेट्स पूर्ण करणाऱ्यांचा विचार केला, तर यामध्ये पहिल्या क्रमांकावर राशिद खान येतो. राशिदने त्याच्या १०० विकेट्स केवळ ५३ डावांमध्ये पूर्ण केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा आहे, ज्याने ७६ डावांमध्ये हा विक्रम केला आहे.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर टिम साउदी आहे, ज्याने ८२ डावांमध्ये हा टप्पा पार केला आहे. सर्वात शेवटी चौथ्या स्थानावर शाकिब अल हसन आहे, त्याने त्याच्या १०० विकेट्स ८३ डावांमध्ये पूर्ण केल्या आहेत. या चौघांनाच आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये १०० विकेट्सचा टप्पा ओलांडता आला आहे.
याबरोबरच राशिदने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घणाऱ्यांच्या यादीत न्यूझीलंडच्या टिम साउदीला मागे टाकले आहे. राशिद या यादीत १०१ विकेट्सह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर बांगलादेशचा शाकिब अल हसन (११७), दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा लसिथ मलिंगा(१०७) आहे आणि चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा टिम साउदी (१००) आहे.
दरम्यान, शुक्रवारी झालेल्या समान्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये सहा विकेट्सच्या नुकसानावर १४७ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात, पाकिस्तानने हे लक्ष्य पाच विकेट्सच्या नुकसानावर १९ षटकांमध्ये गाठले आणि विश्वचषकातील सलग तिसरा विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –
बाबर आझम ‘कर्णधार’ कोहलीवर पडला भारी! टी२० मधील ‘तो’ मोठा विश्वविक्रम केला आपल्या नावे





