महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2025 मध्ये शुक्रवारी (13 जून) तीन सामने खेळले जातील. विजयी लय सापडलेला रत्नागिरी जेट्स व सलग दोन पराभव झालेला पीबीजी कोल्हापूर टस्कर्स यांच्या दरम्यान हा सामना होणार आहे. रत्नागिरी सलग तिसरा विजय मिळवण्यासाठी तर, कोल्हापूर आपल्या दुसऱ्या विजयासाठी प्रयत्नशील असेल.
दोन वेळेचे विजेते असलेल्या रत्नागिरी जेट्स यांच्यासाठी स्पर्धेची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली होती. त्यांना आपल्या पहिल्या तीन सामन्यात पराभव पत्करावा लागलेला. मात्र, यानंतर त्यांनी पुनरागमन करत सलग दोन सामने जिंकले. दुसऱ्या बाजूने पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने पहिल्या सामन्यात रत्नागिरी जेट्सलाच मात दिली होती. मात्र, त्यानंतर त्यांना सलग दोन सामन्यात पराभव स्वीकारावे लागले. आपल्यात चौथ्या सामन्यात विजय मिळवून पुन्हा एकदा विजयी मार्गावर परतण्याचे त्यांच्यापुढे आव्हान असेल.
रत्नागिरी संघासाठी धीरज फटांगरे, अझीम काझी व दिव्यांग हिंगणेकर या फलंदाजांनी आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. किरण चोरमले व अथर्व धर्माधिकारी या युवा फलंदाजांकडून देखील त्यांना मोठी अपेक्षा असेल. तर, गोलंदाजीत प्रदीप दाढे आणि सत्यजित बच्छाव या अनुभवी गोलंदाजांनी आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. पीबीजी कोल्हापूर टस्कर्ससाठी कर्णधार राहुल त्रिपाठी व अंकित बावणे यांचे अपयश चिंतेचा विषय आहे. सिद्धार्थ म्हात्रे, धनराज शिंदे व विशांत हे फलंदाज देखील आपल्या लौकीकाला साजेसा खेळ करू शकले नाहीत. गोलंदाजीत रजनीश गुरबानी, आत्मन पोरे व श्रेयस चव्हाण यांनी आपल्या परीने उपयुक्त योगदान दिले आहे.
एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, गहुंजे येथे होणाऱ्या या सामन्यात खेळपट्टी फलंदाजांना अधिक पोषक असू शकते. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देऊ शकतो. हा सामना सायंकाळी सात वाजता सुरू होईल.
प्लेईंग इलेव्हन
रत्नागिरी जेट्स- धीरज फटांगरे, अथर्व धर्माधिकारी, अझीम काझी, किरण चोरमले, अभिषेक पवार, दिव्यांग हिंगणेकर, सत्यजित बच्छाव, प्रदीप दाढे, प्रथमेश गावडे, जो परदेशी, विजय पावले.
पीबीजी कोल्हापूर टस्कर्स- राहुल त्रिपाठी, अंकित बावणे, सचिन धस, सिद्धार्थ म्हात्रे, श्रीकांत मुंढे, धनराज शिंदे, आनंद ठेंगे, विश्रांत मोरे, दीपक डांगी, रजनीश गुरबानी, श्रेयस चव्हाण






