शनिवारी (दि. 24 जून) महाराष्ट्र प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 14वा सामना पुणेरी बाप्पा विरुद्ध रत्नागिरी जेट्स संघात पार पडला. हा सामना रत्नागिरी जेट्स संगाने डकवर्थ लुईस नियमानुसार 8 धावांनी आपल्या खिशात घातला. या विजयामुळे रत्नागिरी संघाला मोठा फायदा झाला. त्यांनी एमपीएल 2023 स्पर्धेच्या गुणतालिकेत मोठी भरारी घेत थेट अव्वलस्थान पटकावले. रत्नागिरी जेट्स संघाने खेळलेल्या 5 सामन्यांपैकी 4 सामन्यात विजय आणि 1 पराभव पत्करून 8 गुण मिळवले. यामुळे ते थेट गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचले. या सामन्यात केलेल्या कामगिरीसाठी कुणाल थोरात याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील स्टेडियमवर पार पडलेल्या या स्पर्धेत रत्नागिरी जेट्स (Ratnagiri Jets) संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रत्येकी 15 षटकांचा करण्यात आला. सलामीचा फलंदाज पवन शहा 12 धावांवर बाद झाला. त्यानंतर श्रीपाद निंबाळकर व शुभम तैस्वाल यांनी आक्रमक फलंदाजी केली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 10 चेंडूत 25 धावांची भागीदारी केली. श्रीपाद निंबाळकर 30 धावा काढून कुणाल थोरातच्या गोलंदाजीवर झेल बाद झाला. त्याने 3 चौकार व 1 षटकार मारला. त्यांनतर शुभम तैस्वालने 24 चेंडूत 3 चौकार व 2 षटकारासह 36 धावांची खेळी करून धावगती वाढवली.
त्यानंतर मात्र, रत्नागिरीच्या गोलंदाजांनी पुणेरी बाप्पा (Puneri Bappa) संघाचे मधल्या फळीतील फलंदाज झटपट तंबूत परत पाठवले. रोहन दामले (11 धावा), प्रशांत कोरे (13 धावा) हे झटपट बाद झाले. सुरज शिंदेने थोडीशी आक्रमक खेळी करत 15 चेंडूत नाबाद 23 धावा काढून संघाला 15 षटकात 6 बाद 129 धावांचे आव्हान उभे करून दिले. त्यात त्याच्या दोन षटकारांचा समावेश होता. रत्नागिरी जेट्सकडून कुणाल थोरात (2-23), किरण चोरमले (1-11), निकित धुमाळ (1-15), दिव्यांग हिंगणेकर (1-25) यांनी सुरेख गोलंदाजी केली.
गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असलेल्या रत्नागिरी जेट्सला विजयासाठी 130 धावांचे आव्हान होते. अझीम काझी (21 धावा) व प्रीतम पाटील या जोडीने 22 धावांची सलामी दिली. अझीम काझीने 3 चौकार व 1 षटकार खेचले. अझीमला सचिन भोसलेने झेल बाद करून तंबूत परत पाठवले. धीरज व प्रीतम या जोडीने 26 धावांची खेळी करून धावफलक हलता ठेवला. त्यानंतर सचिन भोसले व पियुष साळवी यांनी अनुक्रमे प्रीतम पाटील (20 धावा) व किरण चोरमले (0 धावा) यांना बाद करून सामन्यात रंगत आणली. धीरज फटांगरे नाबाद 18, ऋषिकेश सोनावणे नाबाद 9 धावांवर खेळत असताना पावसामुळे खेळ थांबविण्यात आला. तेव्हा रत्नागिरी संघ 7.4 षटकात 3 बाद 70 धावांवर होता. म्हणजेच डक वर्थ लुईस नियमानुसार रत्नागिरी संघाने (7.4 षटकात 62 धावा) 8 धावांनी आघाडीवर होता व याचा त्यांना फायदा झाला. हवामानाचा अंदाज घेत धीरज फटांगरेने 16 चेंडूत 2 चौकारासह नाबाद 18 धावा, ऋषिकेश सोनावणेने नाबाद 9 धावा काढून केलेली फटकेबाजी संघासाठी निर्णायक ठरली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल-
पुणेरी बाप्पा-15 षटकात 6 बाद 129 धावा
(शुभम तैस्वाल 36 (24, 3×4, 2×6), श्रीपाद निंबाळकर 30 (19, 3×4, 1×6), सुरज शिंदे नाबाद 23, प्रशांत कोरे 13, पवन शहा 12, कुणाल थोरात 2-23, किरण चोरमले 1-11, निकित धुमाळ 1-15, दिव्यांग हिंगणेकर 1-25)
पराभूत वि. रत्नागिरी जेट्स- 7.4 षटकात 3 बाद 70 धावा
(प्रीतम पाटील 20, अझीम काझी 21, धीरज फटांगरे नाबाद 18, ऋषिकेश सोनावणे नाबाद 9, सचिन भोसले 2-17, पियुष साळवी 1-7)
महत्वाच्या बातम्या-
शमीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी आणि वनडे संघातून का वगळलं? खरं कारण आलं समोर, लगेच वाचा
टीम इंडियात निवड झाल्यानंतर आली यशस्वीची प्रतिक्रिया, म्हणाला, “त्या तिघांकडून खूप शिकलो”






