भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shashtri) हे सातत्याने चर्चेत असतात. राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक सोडल्यानंतर त्यांनी अनेक मुलाखतींमधून भारतीय संघाबाबतची विधाने केली आहेत. तसेच, आपल्या परखड व्यक्तिमत्त्वसाठी ओळखल्या जाणाऱ्या शास्त्री यांनी अनेक वेळा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) ही खडेबोल सुनावले आहेत. भारतातील सर्वात मोठी प्रथमश्रेणी क्रिकेट स्पर्धा असलेली रणजी क्रिकेट स्पर्धा अद्याप सुरू न केल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा बीसीसीआयवर ताशेरे ओढले आहेत. (Ravi Shashtri Slams BCCI)
काय म्हणाले शास्त्री?
मागील आठवड्यात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री यांनी माजी भारतीय कर्णधार विराट कोहली व बीसीसीआय यांच्यातील वादावर मोठी प्रतिक्रिया दिली होती. विराटने कर्णधार म्हणून अधिक यश मिळवले काही लोकांना आवडले नसते, असे शास्त्री म्हणाले होते. त्या विधानाची चर्चा थांबेपर्यंत शास्त्री यांनी एक ट्विट करत बीसीसीआयला धारेवर धरले आहे. शास्त्री यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट करत लिहिले,
‘रणजी ट्रॉफी ही भारतीय क्रिकेटचा कणा आहे. तुम्ही सध्या त्याकडे दुर्लक्ष करत आहात. हे असेच राहिले तर, आपल्या क्रिकेटला कणा राहणार नाही.’
The Ranji Trophy is the backbone of Indian cricket. The moment you start ignoring it our cricket will be SPINELESS!
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) January 28, 2022
रणजी ट्रॉफी सुरु होण्यास विलंब
कोरोनाच्या पुढील लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता बीसीसीआयने अद्याप रणजी ट्रॉफी सर्वात मोठी स्पर्धा सुरू केलेली नाही. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार रणजी ट्रॉफीला जानेवारी महिन्यात सुरुवात होणार होती. मात्र, देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने बीसीसीआयने स्पर्धेला स्थगिती दिली. सध्या रणजीचा हंगाम दोन टप्प्यांमध्ये घेण्याचा विचार सुरू आहे. याचा पहिला टप्पा फेब्रुवारी-मार्च महिन्यात तर, दुसरा टप्पा ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात खेळवला जाऊ शकतो. (Ranji Trophy 2021-2022)
मागील वर्षी रद्द करावा लागला हंगाम
रणजी ट्रॉफीचा २०२०-२०२१ हंगाम कोरोनामूळे रद्द करण्यात आला होता. स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडली होती. सध्या सौराष्ट्र संघ रणजी ट्रॉफीचा विजेता आहे. भारताचे दिग्गज क्रिकेटपटू रणजीतसिंह यांच्या नावाने सुरू असलेली ही स्पर्धा सर्वाधिक वेळा मुंबईने आपल्या नावे केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
मेगा लिलावापूर्वी ‘थला’ चेन्नईत दाखल! १५ वर्षांत पहिल्यांदाच दिसणार ‘ते’ चित्र? (mahasports.in)