भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने युएई मध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. या कामगिरीची दाखल घेत, त्याला ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत संधी देण्यात आली होती. त्याचे कसोटी क्रिकेट खेळायचे स्वप्न सत्यात उतरणार इतक्यात त्याच्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला होता. ऑस्ट्रेलिया मध्ये पोहोचल्यानंतर त्याला ही दुःखद बातमी कळाली होती. त्याने सर्व सोडून पुन्हा घरी जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याची समजूत काढली होती. एका मुलाखतीत सिराजने याबाबतचा खुलासा केला आहे.
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत, मोहम्मद सिराजने म्हटले की, “विराट भाई नेहमीच माझ्यासोबत होता. जेव्हा दोन वर्षांपूर्वी मी आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यास अपयशी ठरत होतो. तेव्हा विराट भाईने माझ्यावर विश्वास दाखवला होता. त्याने मला आरसीबी मध्ये रिटेन केले होते. त्यामुळे मी त्याचे आभार मानतो.”
रवी शास्त्रींनी दिला होता धीर
तसेच तो पुढे म्हणाला की, “जेव्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना, माझ्या वडिलांचे निधन झाले होते. तेव्हा रवी सर आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी मला खूप धीर दिला होता. रवी सर माझ्या जवळ आले आणि म्हणाले होते की, तू कसोटी सामना खेळ, तू नक्की ५ गडी बाद करशील. तुझ्या वडिलांचे आशीर्वाद तुझ्यासोबत असतील. सामना झाल्यानंतर रवी सरांनी खुश होऊन मला म्हटले की, मी आधीच म्हणालो होतो की तू ५ गडी बाद करशील. माझा आत्मविश्वास खूप वाढला होता.”
सध्या मोहम्मद सिराजला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी आणि इंग्लंड दौऱ्यावर होणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. त्याने आयपीएल २०२१ स्पर्धेत देखील आपल्या गोलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. सिराजने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत एकूण ५ सामने खेळले आहेत. यात त्याला १६ गडी बाद करण्यात यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनीने थेट स्कॉटलंडवरुन मागवला खास घोडा, किंमत पाहून तुम्हीही व्हाल थक्क
विराट किंवा रोहित नाही तर गावसकरांच्या मते हा आहे टी२० क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज
कमालच! सहा वर्षांचा चिमुकला चक्क धोनी स्टाइलमध्ये मारतो आहे हेलिकॉप्टर शॉट, पाहा व्हिडिओ