भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार कसोटी सामन्यांची बॉर्डर गावसकर मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तीन कसोटी सामने पार पडले आहेत. या मालिकेतील तिसरा अनिर्णित राहिला. त्यामुळे मालिकेत दोन्ही संघ प्रत्येकी एक एक सामना जिंकून बरोबरीत आहे. या मालिकेतील शेवटचा सामना निर्णायक ठरणार आहे. चौथा कसोटी सामना 15 जानेवारी पासून ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर खेळला जाणार आहे.
जर भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली चौथा सामना जिंकला, तर रवि शास्त्री खोटे ठरू शकतात. परंतु भारतीय संघासाठी हा सामना जिंकणे सोपे असणार नाही. कारण भारतीय संघाचे बरेच दिग्गज खेळाडू सध्या भारतीय संघात नाहीत. त्याचबरोबर जे खेळाडू संघात आहेत, त्यांना दुखापत झाली आहे. त्यामुळे भारतीय संघाला हा सामना जिंकणे अवघड जाणार आहे. त्याचबरोबर मागील 32 वर्षापासून ऑस्ट्रेलियाचा संघ ब्रिस्बेन मध्ये एकही सामना पराभूत झालेला नाही. तसेच या ठिकाणी भारतीय संघाची कामगिरी अतिशय खराब राहिली आहे. ब्रिस्बेन येथे भारतीय संघाने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. त्यापैकी 5 सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला आहे आणि एक सामना अनिर्णीत राहिला.
विराटनंतर ऑस्ट्रेलियात मालिका जिंकणारा अजिंक्य ठरेल दुसरा कर्णधार
जर ब्रिस्बेन येथे खेळला जाणारा चौथा कसोटी भारतीय संघाने जिंकला, तर विराट कोहली नंतर ऑस्ट्रेलियात मालिका जिंकणारा अजिंक्य रहाणे दुसरा भारतीय कर्णधार ठरेल. विराट कोहलीने भारतीय संघाचे नेतृत्व करताना 2018-19 साली ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्याच भूमित मालिकेत पराभूत केले होते. त्यामुळे आता ही मालिका जिंकणारा दुसरा कर्णधार होण्याची संधी अजिंक्य रहाणेकडे आहे.
रवि शास्त्री यांचे विधान ठरणार खोटे
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळल्या गेलेल्या मागील 71 वर्षातील कसोटी क्रिकेटवर लिहिलेल्या एका पुस्तक प्रकाशनात विराट कोहलीची प्रशंसा करताना रवि शास्त्री म्हणाले, “71 वर्ष वाट पाहिल्यानंतर ऑस्ट्रेलियात भारताने पहिली मालिका जिंकल्याने खूप आनंद झाला होता. विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध देशात आणि परदेशात ज्या प्रकारे कामगिरी केली आहे. तसा दुसरा कर्णधार खूप काळ करू शकणार नाही. जे काम विराटने मागील दौऱ्यात केले होते. असे कदाचित कोणता भारतीय खेळाडू कर्णधार करू शकणार नाही.” मात्र जर रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने चौथ्या कसोटीत विजय मिळविला तर रवी शास्त्री यांचे विधान खोटे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
अपना विहारी सब पर भारी, भाजपा खासदाराच्या त्या टीकेला विरूचे अनोख्या अंदाजात प्रत्युत्तर
भोपळ्यांची मालिका संपेना! हा खेळाडू सलग चार डावात झाला शून्यावर बाद, नकोशा यादीत मिळाले स्थान
हम है तय्यार! ब्रिस्बेन कसोटीसाठी भारतीय संघाचा कसून सराव; पाहा व्हिडिओ