हेडिंग्ले येथे पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. ज्यानंतर विराट कोहलीने चौथ्या सामन्यासाठी भारतीय संघात मोठ्या बदलांचे संकेत दिले आहेत.
हेडिंग्ले कसोटी सामन्यानंतर कोहलीने एका पत्रकार परिषदेत याबद्दल सांगितले. तिसरा कसोटी सामना २ सप्टेंबरपासून ओवलच्या मैदानात खेळविण्यात येणार आहे. यात एखाद्या वेगवान गोलंदाजाला आराम दिला जाऊ शकतो, असे संकेत कोहलीने दिले.
याबाबत बोलताना कोहली म्हणाला, “पुढील सामन्यात भारतीय संघात बदल होऊ शकतात. तसे होणे गरजेचे देखील आहे. कारण आम्हाला गोलंदाजांवर अधिक भार टाकायचा नाही. ज्यामुळे ते दुखापतग्रस्त होतील. आम्ही त्यांच्या सोबत चर्चा करू. आपण सर्वांकडून अशी आशा नाही करू शकत, की लागोपाठ ४ कसोटी सामन्यांमध्ये खेळले जावे. ज्यामुळे आम्ही सर्व गोष्टीचे नियोजन करून कोणत्या गोलंदाजाला आराम देण्याची गरज आहे, हे ठरवू.”
अशात तिसऱ्या कसोटी सामन्यात गोलंदाज म्हणून इशांत शर्मा अपयशी ठरला. ज्यामुळे अशी शक्यता वर्तवली जात आहे, की पुढील सामन्यात इशांत शर्माला आराम दिला जाऊ शकतो. मात्र याबाबत कोहलीने काहीही स्पष्ट केले नाही. याबाबत कोहलीला जेव्हा विचारले की, ईशांत शर्माला रनअपशी संबंधित काही अडचण आहे का? यावर कोहली म्हणाला, “माझे इशांत शर्माच्या रनअपवर लक्ष नव्हते, कारण मी स्लिपवर उभा होतो.”
जर पुढील सामन्यात इशांत शर्माला आराम देण्यात आला, तर त्याच्या जागी रविचंद्रन अश्विनला संघात स्थान मिळू शकते. आतापर्यंतच्या मालिकेत एकाही सामन्यात अश्विनला खेळण्याची संधी मिळाली नाही. अश्विनने यापूर्वीच जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात ३ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच काउंटी क्रिकेटमध्ये देखील एका सामन्यात त्याने ६ विकेट्स घेतल्या होत्या.
तसेच भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर आणि दिलीप वेंगसरकर यांनी तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर कोहलीला संघात बदल करण्याचा सल्ला दिला होता. तेव्हा त्यांनी एका अतिरिक्त फलंदाजाला संघात सामील करण्याचा सल्ला दिला होता.
याबाबत जेव्हा कोहलीला विचारले तेव्हा कोहली म्हणाला, “तुम्ही एक अतिरिक्त फलंदाज खेळण्यास सांगता? मात्र, मी या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. तसेच या आधीही माझा या गोष्टीवर विश्वास नव्हता. कारण अशा स्थितीत एकतर तुम्ही पराभव वाचवण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी प्रयत्न करत असता. याआधीही इतिहासात आपण अतिरिक्त फलंदाजांच्या मिश्रणात खेळलो होतो, मात्र यामुळे आपले अनेक सामने अनिर्णित राहिले होते.”
पुढे बोलताना कोहली म्हणाला, “जर तुमचे प्रमुख फलंदाज अपयशी होत असतील, तर या गोष्टीची काहीही खात्री नाही की आपला अतिरिक्त फलंदाज आपला सामना वाचवू शकतो. आपल्याला जबाबदारी घेऊन संघासोबत काम करण्यावर अभिमान असला पाहिजे. जर आपल्या जवळ कसोटी सामन्यात २० विकेट्स घेण्याची क्षमता नसेल. तर तुम्ही आधीच सामना वाचवण्यासाठी खेळत असता, आणि हे आपल्या खेळाचा प्रकार नाही.”
“संघातील अंतिम ११ बाबत कोणतीही अडचण नव्हती. आम्ही फलंदाजी विभाग म्हणून अपयशी राहिलो. दुसऱ्या डावात आम्ही थोडा चांगला खेळ दाखवला होता. मात्र मी हे मान्य करतो की, आमच्या गोलंदाजी विभागाने देखील म्हणावे तसे प्रदर्शन केले नाही,” असेही कोहली म्हणाला.
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना गुरुवार पासून (२ सप्टेंबर) ओवलच्या मैदानात सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–तब्बल ‘एवढ्या’ कोटी रुपयांचे नुकसान पत्करून रोनाल्डो खेळणार मँचेस्टर युनायटेडसाठी
–‘तू महान खेळाडू झालास’, ज्याचा विक्रम मागे टाकला त्यानेच रुटचा लहानपणीचा फोटो केला शेअर
–‘अँडरसनने शिकवलेल्या वॉबल ग्रिपचा वापर सामन्यात केला अन् त्याचा फायदाही झाला’, रॉबिन्सनचा खुलासा