चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा फिरकीपटू आर अश्विन जबरदस्त फॉर्ममध्ये दिसून आला आहे. विशेष म्हणजे चेपॉक स्टेडियम हे अश्विनचे घरचे मैदान आहे. त्यामुळे त्याने काही खास विक्रम या सामन्यादरम्यान केले आहे.
अश्विनने या सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावात गोलंदाजी करताना ४३ धावांत ५ विकेट्स घेतल्या. ज्यामुळे भारताला इंग्लंडचा पहिला डाव १३४ धावांत गुंडाळण्यात यश आले. यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाकडून अश्विनने ८ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना अर्धशतकी खेळी केली आहे.
त्यामुळे तो घरच्या मैदानावर एका कसोटी सामन्यात अर्धशतक आणि एका डावात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी करणारा पहिला आणि एकमेव भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी अशी कामगिरी कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूला करता आली नव्हती.
सहाव्यांदा एकाच कसोटीत अर्धशतक आणि ५ विकेट्स –
याबरोबरच अश्विनने कसोटीमध्ये एकाच सामन्यात अर्धशतक आणि एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी सहाव्यांदा केली आहे. त्यामुळे त्याने सर्वाधिकवेळा एकाच कसोटी सामन्यात अर्धशतक आणि एका डावात ५ किंवा त्यापेक्षा विकेट्स घेणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या रिचर्ड हॅडली यांची बरोबरी केली आहे. हॅडली यांनीही ६ वेळा अशी कामगिरी केली आहे.
या यादीत अव्वल क्रमांकावर इयान बॉथम असून त्यांनी ११ वेळा ही कामगिरी केली आहे. तर बांगलादेशच्या शाकिब अल हसनने ९ वेळा अशी कामगिरी केली आहे. त्यामुळे तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
समालोचकांनी अश्विनला केलं सरपंच –
अश्विन फलंदाजी करत असताना ज्याप्रकारे शानदार शॉट खेळत होता, ते पाहुन आणि त्याची गोलंदाजीतीलही कामगिरी लक्षात घेऊन त्याला समालोचकांनी चेन्नईचा सरपंच असं गमतीने म्हणण्यास सुरुवात केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
व्हिडिओ: उडता ऑली पोप..! हवेत सूर मारत पठ्ठ्याने पकडला अविश्वसनीय झेल, रहाणे बघतचं राहिला
इंग्लंडचा धोनी!! पुजारा आणि रोहितनंतर बेन फोक्सच्या चपळाईपुढे रिषभ पंतही गपगार
कर्माची फळे भोगावी लागणारचं! एका वर्षापुर्वीच्या ‘त्या’ कृत्यासाठी युवराज सिंग विरोधात ‘एफआयआर’ दाखल