भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन आश्विन सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने आपल्या फिरकीने विरोधी फलंदाजांना चांगलाच त्रास दिला. सोबतच, फलंदाजीतही त्याने दमदार कामगिरी करत अष्टपैलू म्हणून आपली भूमिका पार पाडली. कसोटी संघाचा अविभाज्य भाग असलेल्या अश्विनच्या मर्यादित षटकांच्या संघातील समावेशाविषयी सध्या चर्चा होत आहे. आता स्वतः अश्विनने पुढे येत त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
“मी सध्या समाधानी आहे”
नुकत्याच इंग्लंडविरुद्ध संपलेल्या कसोटी मालिकेत अश्विनने ३२ बळी मिळवून मालिकावीर पुरस्कार जिंकला. चेन्नई कसोटीत त्याने दमदार शतक झळकावले होते.
मर्यादित षटकांच्या संघातील आपल्या समावेशाविषयी बोलताना तो म्हणाला, “लोक मला वारंवार वनडे व टी२० संघातील समावेशाविषयी विचारत असतात. मला हसू येते. मी सध्या अत्यंत शांत आणि समाधानी देखील आहे. मला जेव्हा संधी मिळेल तेव्हा, मी दमदार कामगिरी करणार हे निश्चित आहे. मी लोक काय बोलतात याची चिंता करत नाही. सध्या मिळत असलेल्या संधीमध्ये चांगले करण्याचा माझा प्रयत्न असतो.”
अश्विनने आपल्या वनडे कारकिर्दीत १११ सामने खेळताना १५० तर, ४६ टी२० सामन्यात ५२ बळी आपल्या नावे केले आहेत.
मर्यादित षटकांच्या संघातून बाहेर आहे अश्विन
अश्विन जुलै २०१७ पासून भारताच्या मर्यादित षटकांच्या संघातून बाहेर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युजवेंद्र चहल व कुलदीप यादव यांचे आगमन झाल्यानंतर रविचंद्रन आश्विन व रवींद्र जडेजा यांना संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. कालांतराने, जडेजा संघात पुनरागमन करण्यास यशस्वी ठरला. मात्र, अश्विन अजूनही आपल्या संधीची वाट पाहत आहे. सध्या भारताच्या वनडे व टी२० संघात युजवेंद्र चहल, राहुल चहर, अक्षर पटेल व वॉशिंग्टन सुंदर यांसारखे गोलंदाज आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
पूनम राऊतची आयसीसी क्रमवारीत मोठी झेप, अव्वल २० फलंदाजांमध्ये मिळवले स्थान
डिलिट करा ते! आयसीसीने शेअर केलेल्या ‘एमएस मलिंगा’ फोटोवर चाहते भडकले





