सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात अनुभवी व सर्वोत्तम फिरकीपटू म्हणून भारताच्या रविचंद्रन अश्विनकडे पाहिले जाते. गेली १२ वर्ष तो भारतीय संघाचा प्रमुख फिरकीपटू म्हणून ओळखला जातो. आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने त्याने आत्तापर्यंत भारतीय संघाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. मात्र, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यापूर्वी त्याने आपल्या निवृत्तीविषयी एक महत्वपूर्ण योगदान केले आहे.
निवृत्तीबद्दल अश्विनचे महत्वपूर्ण विधान
भारतीय संघ सध्या एजबॅस्टन येथे न्यूझीलंड विरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळत आहे. या, ऐतिहासिक सामन्यापूर्वी आयसीसीला दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना अश्विनने क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याविषयी भूमिका मांडली.
अश्विन म्हणाला, “कसोटी क्रिकेटचे सौंदर्य म्हणजे आपण नेहमीच परिपूर्ण होण्याची आकांक्षा बाळगतो. परंतु, काहीवेळा उत्कृष्टतेमुळे देखील आनंद मिळतो. मी माझ्या कारकीर्दीत आतापर्यंत जे काही साध्य केले ते याच दृष्टिकोनामुळे शक्य झाले. मी कोणत्याही गोष्टीत समझोता केला नाही. माझा भर नेहमी सुधारणा करण्यावर राहतो.”
अश्विन पुढे बोलताना म्हणाला, “जर मी माझ्या खेळात सुधारणा करू शकलो नाही आणि स्वतःच्या खेळामुळे ज्यावेळी संतुष्ट झालो, असे जेव्हा मला वाटेल तेव्हा मी खेळ पुढे चालू ठेवणार नाही.” अश्विनने या मुलाखतीत आपल्या कारकीर्दीतील अनेक गोष्टींचा खुलासा केला.
दैदिप्यमान राहिली आहे अश्विनची कारकीर्द
भारतीय संघासाठी रविचंद्रन अश्विनने २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जिंकलेल्या २०११ विश्वचषक विजेत्या संघाचा तो सदस्य राहिला आहे. अनिल कुंबळे व हरभजन सिंग या दिग्गज क्रिकेटपटूंचा वारसा त्याने अविरतपणे पुढे चालू ठेवला असून, तो सध्या केवळ भारताच्या कसोटी संघाचा भाग आहे.
त्याने आत्तापर्यंत खेळलेल्या ७८ कसोटीमध्ये ४०९ बळी मिळवण्याची किमया केली आहे. तसेच त्याच्या नावे ५ शतके देखील जमा आहेत. तर, १११ वनडे सामन्यात तो १५० बळी मिळविण्यात यशस्वी झाला असून, ४६ टी२० सामन्यात त्याला ५२ बळी मिळविण्यात यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यात अपयशी ठरतो! पाहा ‘ही’ आकडेवारी
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! आगामी काळात भारतात रंगू शकतात ‘या’ तीन मोठ्या आयसीसी स्पर्धा
भारतीय क्रिकेटसाठी २० जून का आहे सर्वात खास? घ्या जाणून