विशाखापट्टणम। बुधवारपासून(2 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात रविंद्र जडेजाने पहिल्या डावात आज(4 ऑक्टोबर) तिसऱ्या दिवसाखेर 2 विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 200 विकेट्स घेण्याचा पराक्रमही केला आहे.
दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या डावात 160 धावांची दिडशतकी खेळी करणारा डिन एल्गार जडेजाची 200 वी विकेट ठरला.
जडेजाने 44 व्या कसोटी सामन्यात खेळताना 200 कसोटी विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. त्यामुळे तो सर्वात जलद 200 कसोटी विकेट्स घेणारा डावकरी गोलंदाज ठरला आहे. त्याने श्रीलंकेचा दिग्गज डावकरी गोलंदाज रंगना हेराथला मागे टाकले आहे. हेराथने 47 कसोटी सामन्यात 200 कसोटी विकेट्सचा टप्पा पार केला होता.
याचबरोबर जडेजा सर्वात जलद 200 कसोटी विकेट्स घेणाऱ्या एकूण गोलंदाजांच्या यादीत सातव्या तर भारतीय गोलंदाजांच्या यादीत आर अश्विननंतर दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. भारताकडून अश्विनने 37 कसोटी सामन्यात 200 कसोटी विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.
जडेजाने भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत एल्गारच्या आधी डेन पायट्तला बाद केले होते. या सामन्यात आज तिसऱ्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 8 बाद 385 धावा केल्या आहेत.
या डावात दक्षिण आफ्रिकेकडून एल्गारबरोबर क्विंटॉन डी कॉकने 111 धावांची शतकी खेळी तर कर्णधार फाफ डू प्लेसिसने 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच सेनुरन मुथूसामी(12) आणि केशव महाराज(3) नाबाद खेळत आहे.
भारताकडून तिसऱ्या दिवसाखेर जडेजाच्या 2 विकेट्सबरोबरच अश्विनने 5 विकेट्स आणि इशांत शर्माने 1 विकेट घेतली आहे.
जडेजाने केले हे विक्रम –
#सर्वात जलद 200 कसोटी विकेट्स घेणारे डावकरी गोलंदाज –
44 सामने – रविंद्र जडेजा
47 सामने – रंगना हेराथ
49 सामने – मिशेल जॉन्सन
50 सामने – मिशेल स्टार्क
51 सामने – बिशन सिंग बेदी, वासिम अक्रम
#सर्वात जलद 200 कसोटी विकेट्स घेणारे गोलंदाज –
33 सामने – यासिर शहा
36 सामने – क्लेर ग्रिममेट
37 सामने – आर अश्विन
38 सामने – वकार युनुस, डेनिस लीली
39 सामने – डेल स्टेन
41 सामने – इयान बॉथम, स्टुअर्ट मॅकगिल
42 सामने – शेन वॉर्न, माल्कम मार्शल, ऍलेन डोनाल्ड, मुथय्या मुरलीधरन
44 सामने – रविंद्र जडेजा, ऍलेक बेडसर, जोएल गार्नर, रिचर्ड हॅडली
#सर्वात जलद 200 विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज –
37 सामने – आर अश्विन
44 सामने – रविंद्र जडेजा
46 सामने – हरभजन सिंग
47 सामने – अनिल कुंबळे
48 सामने – भागवत चंद्रशेखर