इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC)मध्ये एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. जडेजा WTCच्या इतिहासातील पहिला आणि एकमेव खेळाडू ठरला आहे, ज्याने या स्पर्धेत 2000 पेक्षा अधिक धावा आणि 100 पेक्षा अधिक विकेट्स मिळवल्या आहेत.
भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत प्रथम फलंदाजी करताना 587 धावांचा डोंगर उभारला. कर्णधार शुबमन गिलने 269 धावांची ऐतिहासिक खेळी केली. त्याच्या या खेळीत जडेजाने महत्त्वपूर्ण योगदान देत 89 धावा फटकारल्या. या खेळीच्या जोरावर जडेजाने WTCमध्ये 2010 धावांचा टप्पा पार केला. यासोबतच त्याच्या नावावर 132 विकेट्सही नोंदवण्यात आल्या आहेत.
रवींद्र जडेजाने ही कामगिरी केवळ 41 कसोटी सामन्यांत केली आहे. यामुळे त्याचे ऑलराउंड कौशल्य पुन्हा एकदा सर्वांच्या नजरेत भरले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याचे स्थान आणखी मजबूत झाले आहे.
दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सदेखील अशाच विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. स्टोक्सने WTCमध्ये आतापर्यंत 55 सामन्यांत 3365 धावा केल्या असून त्याच्या खात्यात 86 विकेट्स आहेत. येत्या सामन्यांमध्ये जर त्याने 14 बळी घेतले, तर तोदेखील जडेजासारखा ऑलराउंड विक्रम गाठू शकेल.
या सामन्यात जडेजाची खेळी भारतासाठी निर्णायक ठरली. भारताने 211 धावांवर 5 फलंदाज गमावले असताना त्याने शुबमन गिलसोबत 203 धावांची भागीदारी करत डाव सावरला. जडेजा भलेही शतकापासून 11 धावांनी दूर राहिला, पण त्याचे योगदान मोलाचे ठरले.
दुसऱ्या दिवसअखेर भारताने 510 धावांची आघाडी घेतली असून इंग्लंडने 3 विकेट्स गमावून 77 धावा केल्या आहेत. या स्थितीत भारताच्या विजयाच्या शक्यता प्रबळ झाल्या आहेत.