भारत विरुद्ध इंग्लंड एजबॅस्टन येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शुबमन गिलच्या दमदार 269 धावांच्या खेळीमुळे भारताने पहिल्या डावात 587 धावा फटकावत इंग्लंडवर मजबूत दडपण आणले आहे. यशस्वी जयस्वाल (87) आणि रवींद्र जडेजा (89) यांनीही भरीव योगदान दिले. मात्र, इतकी मोठी धावसंख्या असूनही विजय निश्चित मानता येत नाही, कारण एजबॅस्टनवरचा इतिहास काहीसा वेगळंच चित्र दाखवतो.
इतिहास सांगतो की, एजबॅस्टनमध्ये जेव्हा जेव्हा पाहुण्या संघाने पहिल्या डावात 500 पेक्षा अधिक धावा केल्या, तेव्हा त्यांना विजय मिळवता आलेला नाही. पाकिस्तानने 1971 साली 608/8 डिक्लेअर तर दक्षिण आफ्रिकेने 2003 मध्ये 594/5 डिक्लेअर केल्या होत्या, पण हे दोन्ही सामने अनिर्णीत राहिले.
दुसरीकडे, यजमान इंग्लंडने या मैदानावर 4 वेळा 500 पेक्षा जास्त धावा करताना सर्व सामने जिंकले आहेत. 1979 मध्ये भारताविरुद्ध 633/5 डिक्लेअर, 2004 मध्ये विंडीजविरुद्ध 566/9 डिक्लेअर, 1962 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 544/5 डिक्लेअर आणि 2017 मध्ये पुन्हा विंडीजविरुद्ध 514/8 डिक्लेअर करीत इंग्लंडने विजय मिळवला.
दरम्यान, सामन्याच्या दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडची अवस्था 3 बाद 77 अशी झाली असून जो रूट आणि हॅरी ब्रूक मैदानावर आहेत. भारतासाठी ही भागीदारी लवकर फोडणे आवश्यक ठरणार आहे. भारत सध्या 510 धावांनी आघाडीवर असून, इंग्लंडला 387 धावांपूर्वी गुंडाळण्यात यश आल्यास फॉलोऑन देण्याची संधी मिळणार आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाची अद्भुत फलंदाजी पाहायला मिळाली, ज्यामध्ये त्याने 137 चेंडूत 10 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 89 धावांची शानदार खेळी केली. जडेजा फलंदाजीसाठी आला तेव्हा टीम इंडियाचा स्कोअर 5 विकेट गमावून 211 धावा होता. त्यानंतर, त्याने कर्णधार शुबमन गिलसोबत सहाव्या विकेटसाठी 203 धावांची भागीदारी केली आणि टीम इंडियाचा स्कोअर 587 पर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.





