भारत विरुद्ध बांगलादेश संघात सुरू असलेल्या विश्वचषक 2023 स्पर्धेतील 17व्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत बांगलादेशला 256 धावांवर रोखले. या सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षकांनी देखील गोलंदाजांना उत्तम साथ दिली. भारताचा अव्वल क्षेत्ररक्षक असलेल्या रवींद्र जडेजा याने एक जबरदस्त झेल टिपला. मात्र चर्चा त्यानंतर त्याने केलेल्या सेलिब्रेशनची होताना दिसतेय.
https://twitter.com/1m_lucifer45/status/1714973402463948829?t=pOBnz6N9eJpz4e0LvWYISQ&s=19
तंजीद हसन आणि लिटन दास या सलामी जोडीने बांगलादेशला पहिल्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी रचली. मात्र, पुढील 36 धावांच्या आतच संघाच्या तीन विकेट्स पडल्या. त्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या मुशफिकूर रहीम याने काही आक्रमक फटके खेळले. तो संघाचा डाव वेगाने पुढे घेऊन जात असताना जसप्रीत बुमराह याच्या गोलंदाजीवर रवींद्र जडेजा याने उजवीकडे झेपावत त्याचा शानदार झेल टिपला.
यानंतर त्याने भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये पाहत गळ्यात काहीतरी घालत असल्याचा इशारा केला. तो इशारा त्याने संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक की दिलीप यांना केला होता. स्वतः दिलीप यांनी देखील टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले.
या विश्वचषकात भारतीय ड्रेसिंग रूममध्ये एक नवी परंपरा सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला एक मेडल दिले जाते. पहिल्या सामन्यात विराट कोहली याने हे मेडल मिळवले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात शार्दुल ठाकूर तर तिसऱ्या सामन्यात राहुल यांनी हे मेडल जिंकलेले.
(Ravindra Jadeja Imitate Medal Celebration After Catch Of Rahim)