इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने भारतीय संघावर १ डाव आणि ७६ धावांनी विजय मिळवला होता. या विजयासह इंग्लंड संघाने कसोटी मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे. या सामन्यादरम्यान भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला दुखापत झाली होती. ज्यामुळे आर अश्विन पुनरागमन करण्याच्या चर्चांना उधाण आले होते. परंतु आता रवींद्र जडेजा फिट असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आर अश्विनच्या खेळण्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रवींद्र जडेजाला या मालिकेतील तिन्ही सामन्यात खेळण्याची संधी देण्यात आली आहे. तो बॅटने योगदान देत आहे. परंतु त्याला गडी बाद करण्यात यश येत नाहीये. दरम्यान तिसऱ्या कसोटी सामन्यात तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे सामना झाल्यानंतर त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यात आले होते आणि त्याच्या गुडघ्याची स्कॅनिंग देखील करण्यात आली होती.
म्हणून चौथ्या कसोटी सामन्यात जडेजाऐवजी अश्विनला संधी दिली जाईल, असा अंदाज व्यक्त केला गेला होता. परंतु सामन्याच्या एक दिवस अगोदर गोलंदाजी प्रशिक्षकांनी जडेजा पूर्णपणे फिट असल्याची माहिती दिली आहे.
भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, “रवींद्र जडेजाची चाचणी केवळ एक खबरदारी म्हणून करण्यात आली होती. रुग्णालयात त्याला ते वस्त्र परिधान करावे लागले होते. त्यानंतर त्याने ते फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. परंतु तो आता पूर्णपणे फिट आहे.” (Ravindra Jadeja is fit and ready to play,says bowling coach bharat arun)
तसेच ते पुढे म्हणाले की, “इंग्लंडला अश्विनच्या गोलंदाजीची चांगलीच जाण आहे. परंतु ओव्हलची खेळपट्टी फिरकीपटूंना जास्त मदत करत नाही. त्यामुळे अश्विनला संधी मिळणे हे परिस्थितीवर अवलंबून असेल. अश्विन सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक आहे. परंतु दुर्वैवाने त्याला खेळायची संधी मिळाली नाही. जर तशी स्थिती निर्माण झाली तर ते दोघे (जडेजा आणि अश्विन) एकत्र गोलंदाजी करतील.”
इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये चौथा कसोटी सामना येत्या २ सप्टेंबरपासून ओव्हलच्या मैदानावर पार पडणार आहे. लीड्समध्ये पराभूत झाल्यानंतर ही मालिका १-१ ने बरोबरीत आली आहे. त्यामुळे चौथा कसोटी सामना निर्णायक ठरणार आहे. दरम्यान प्लेइंग इलेव्हेनमध्ये कोणाला संधी द्यावी, ही विराटसाठी चिंतेची बाब असणार आहे. कारण अश्विनला मालिकेतील एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाहीये. अश्विनला संधी मिळत नसल्याने चाहते देखील प्रश्न उपस्थित करू लागले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
बांगलादेशचे गोलंदाज ‘किवीं’वर पडले भारी; पहिल्या टी२०त ७ विकेट्सने उडवला धुव्वा
बांगलादेशपुढे न्यूझीलंडचे फलंदाज निष्प्रभ, ९ जण एकेरी धावसंख्येवर बाद; टी२०तील नकोसा विक्रम नावे
कसोटी मालिकेत भारताची आघाडी पक्की? ‘या’ २ शिलेदारांचे ओव्हलवरील रेकॉर्ड वाचून इंग्लंडला फुटेल घाम