भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत पराभूत झाल्याने संघावर चहूबाजूंनी टीका होत होती. भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर यांनी देखील संघनिवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. रवींद्र जडेजाला अंतिम अकरा संघात स्थान देऊ नये, असे वक्तव्य मांजरेकरांनी केले होते. मात्र, बुधवारी (२ डिसेंबर) कॅनबेरा येथे खेळविण्यात येत असलेल्या तिसर्या वनडे सामन्यात रवींद्र जडेजाने दमदार अर्धशतक झळकावत या टीकेला चोख उत्तर दिले आहे.
५० चेंडूत ६६ धावांची नाबाद खेळी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्या वनडे सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताची एकवेळ ५ बाद १५२ अशी नाजूक अवस्था होती. त्यानंतर सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जडेजाने डावाची सुरुवात सावधपणे केली. हार्दिक पंड्यासह भागीदारी रचताना दोघांनीही आधी एकेरी-दुहेरी धावांवर भर दिला. दोन्ही फलंदाजांनी सेट झाल्यावर शेवटच्या हाणामारीच्या १० षटकांत तब्बल ११० धावा कुटल्या. यात रवींद्र जडेजाचे ६६ धावांचे बहुमूल्य योगदान होते.
या खेळीसह जडेजाने संजय मांजरेकरांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताने दुसरा वनडे सामना गमावल्यानंतर संजय मांजरेकरांनी जडेजावर बोचरी टीका केली होती. जडेजाविषयी मला कुठलीही वैयक्तिक तक्रार नाही, परंतु तो फक्त फलंदाज अथवा गोलंदाज म्हणून सामना जिंकवून देऊ शकत नाही, असे मांजरेकर म्हणाले होते. भारतीय संघाने जडेजाऐवजी विशेषज्ञ गोलंदाज किंवा फलंदाज खेळवावा, असाही सल्ला त्यांनी दिला होता.
मोहम्मद कैफने केले जडेजाचे कौतुक
भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने रवींद्र जडेजाची खेळी पाहून त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे. जडेजाबद्दल बोलताना कैफ म्हणाला, “जडेजाला कायमच कमी लेखले जाते, परंतु त्याने पुन्हा एकदा त्याचे अष्टपैलुत्व सिद्ध केले आहे. फलंदाजीत तो केवळ आक्रमक फटकेच खेळू शकतो हा समज चुकीचा आहे. तो संघाच्या गरजेनुरूप एकेरी-दुहेरी धावांसह धावफलक हलता देखील ठेवू शकतो.”
रवींद्र जडेजाने या अर्धशतकासह भारताची धावसंख्या ३०० पार नेण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. भारतीय संघाला या आव्हानाचा बचाव करताना जडेजाने गोलंदाजीतही योगदान देण्याची अपेक्षा असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: आयपीएल २०२० मध्ये एकही सामना खेळायला न मिळालेल्या फलंदाजाची कमाल; ५५ चेंडूत ठोकले दीडशतक
ट्रेंडिंग लेख-
लाजवाब! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिकेत खोर्याने धावा काढणारे ३ भारतीय खेळाडू
लईच धुतलं! ‘या’ तीन भारतीय फलंदाजांकडून टी२० मध्ये कांगारू गोलंदाजांची सर्वाधिक स्ट्राईक रेटने धुलाई





