यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएल १४ व्या हंगामाच्या उर्वरित सामन्यांसाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. काही संघ यूएईला पोहोचले आहेत. तर काही संघ लवकरच युएईची वाट धरणार आहेत. भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असून तेथील खेळाडू अद्यापही यूएईमध्ये पोहोचलेले नाहीत. दरम्यान, संघ व्यवस्थापनाने आपले काम सुरू केले आहे आणि सध्या संघात खेळू न शकणाऱ्या खेळाडूंना बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत सर्व संघांमध्ये ९ बदल करण्यात आले आहेत. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सर्वाधिक बदल करण्यात आले आहेत.
आरसीबीच्या संघात ४ बदल करण्यात आले आहेत. राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्सने प्रत्येकी २ बदल केले आहेत. तर कोलकाता नाईट रायडर्सने प्रत्येकी १ बदल केला आहे. हे सर्व बदल केवळ परदेशी खेळाडूंमध्ये करण्यात आले आहेत.
आरसीबी संघात ४ नवीन बदल
आरसीबी संघासाठी सर्वात मोठा बदल म्हणजे श्रीलंका अष्टपैलू वनिंदू हसरंगाचा समावेश, जो श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरला होता. हसरंगाला ऑस्ट्रेलियाच्या एडम जम्पाच्या जागी निवडण्यात आले आहे. आरसीबीने हसरंगासह श्रीलंकेचा आणखी एक खेळाडू दुष्मंथा चमीराचाही समावेश केला आहे. संघातील तिसऱ्या बदलामध्ये फिन एलनच्या जागी संघात टिम डेविडला संधी देण्यात आली आहे. केन रिचर्डसनच्या जागी जॉर्जी गार्टनचा समावेश करण्यात आला आहे.
राजस्थान रॉयल्समध्ये जगातील अव्वल टी-२० गोलंदाज
राजस्थान रॉयल्सने आपल्या संघात जगातील नंबर १ टी२० गोलंदाजाचा समावेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा तबरेज शम्सी हा खेळाडू आहे. यूएईमध्ये तबरेज शम्सी आता राजस्थानचा वेगवान गोलंदाज अँड्र्यू टायच्या जागी दिसणार आहे. कोरोनामुळे टायने आयपीएलच्या उर्वरित भागातून माघार घेतली आहे. राजस्थानचा मुख्य गोलंदाज जोफ्रा आर्चर देखील दुखापतीमुळे बाहेर झाला असून, त्याच्या जागी ग्लेन फिलिप्सला स्थान देण्यात आले आहे.
केकेआरमधील महत्त्वाचे बदल
कोलकाता नाईट रायडर्सचा सर्वात महागडा खेळाडू पॅट कमिन्स वैयक्तिक कारणांमुळे उर्वरित हंगामात खेळणार नाही. जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक असलेल्या कमिन्सची जागा टिम साउदीने घेतली आहे.
इंग्लंडच्या फिरकीपटूचा पंजाब किंग्जमध्ये समावेश
पंजाब संघाने इंग्लंडच्या आदिल रशीदला खरेदी केले आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनच्या जागी रशीदला संधी दिली आहे. रिचर्डसनने आयपीएलच्या उर्वरित भागातून माघार घेतल्यानंतर पंजाबने हा निर्णय घेतला आहे. रिले मेरीडिथच्या जागी युवा ऑस्ट्रेलियन नॅथन एलिसचा समावेश करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बॅकफूटवर असलेल्या पंजाब किंग्जच्या अपेक्षा उंचावल्या, लीड्स कसोटीचा ‘नायक’ आयपीएलमध्ये खेळणार
आयपीएल २०२१ चा पहिला टप्पा गाजवणारे ‘हे’ शिलेदार सीएसकेला चौथ्यांदा बनवणार विजेता!
सुरेश रैनाने एमएस धोनीला दिली ‘खास’ भेट; सीएसकेने शेअर केलेला फोटो व्हायरल