आयपीएल 2024 मध्ये सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना झाला. या सामन्यादरम्यान समालोचन करताना माजी क्रिकेटपटू मुरली कार्तिक यानं एक धक्कादायक वक्तव्य केलं. कार्तिकनं आरसीबीचा वेगवान गोलंदाज यश दयालसाठी ‘कचरा’ हा शब्द वापरला, ज्यावर आता आरसीबीनं उत्तर दिलं आहे.
पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात यश दयालनं उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्यानं 4 षटकात 23 धावा देत एक विकेट घेतली. मात्र, यशची गोलंदाजी पाहून समालोचनादरम्यान त्याचं कौतुक करताना मुरली कार्तिकची जीभ घसरली. समालोचन करताना तो यशबद्दल म्हणाला, “कुणाचा ‘कचरा’ हा कुणाचा ‘खजिना’ आहे.”
मुरली कार्तिकनं यश दयालच्या आयपीएल 2023 मधील कामगिरीच्या आधारे ही टीप्पणी केली आहे. यश गेल्या मोसमात गुजरात टायटन्स संघाचा भाग होता. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान रिंकू सिंगनं यश दयालच्या एका षटकात सलग पाच षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर यश दयालला पुनरागमन करता आलं नाही. आयपीएल 2024 च्या मिनी लिलावापूर्वी, गुजरात टायटन्सनं यशला संघातून जाऊ दिलं आणि त्यानंतर लिलावात आरसीबीनं त्याला तब्बल 5 कोटी रुपयांना विकत घेतलं. आता यश त्याच्या उत्कृष्ट कामगिरीनं पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
मुरली कार्तिकच्या या वक्तव्यावर आरसीबीकडून प्रतिक्रिया आली आहे. आरसीबीने ट्विट करून म्हटलं, “होय, यश दयाल हा खजिना आहे.”
He’s treasure. Period. ❤🔥 pic.twitter.com/PaLI8Bw88g
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 25, 2024
यश दयाल बद्दल बोलायचं झालं तर त्यानं 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केलं. त्यानं आयपीएलच्या 16 सामन्यांमध्ये 15 बळी घेतले आहेत. या दरम्यान त्यांची इकॉनॉमी 9.66 एवढी राहिली. 40 धावा देऊन 3 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
आयपीएल 2024 च्या सहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाब किंग्जचा 4 गडी राखून पराभव केला. हा त्यांचा या हंगामातील पहिला विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जनं 20 षटकांत 6 गडी गमावून 176 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीनं 19.2 षटकांत ६ गडी गमावून हे लक्ष्य गाठलं.
महत्त्वाच्या बातम्या-
जुनं ते सोनं! क्रिकेटपटू ते समालोचक अन् आता फिनिशर; अशी आहे दिनेश कार्तिकची कारकीर्द
सेम टू सेम! स्टेडियममध्ये दिसला शिखर धवनचा डुप्लिकेट, विराटला हसू आवरेना!
विराट कोहलीनं सॅम करनकडून हिसकावली ऑरेंज कॅप, ‘या’ गोलंदाजाकडे पर्पल कॅपचा ताबा