WPL 2026 स्पर्धेची सुरुवात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाने अत्यंत दमदार पद्धतीने केली. सलग पाच सामने जिंकत आरसीबीने थेट अंतिम फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले. मात्र, स्पर्धेच्या उत्तरार्धात संघाचा विजयी रथ थोडासा घसरलेला दिसत आहे. मागील दोन सामन्यांत आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला असून, तरीही संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. असे असले तरी, कर्णधार स्मृती मानधना संघाच्या अलीकडील कामगिरीवर समाधानी नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या पराभवानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये बोलताना स्मृतीने संघाच्या कामगिरीवर सविस्तर भाष्य केले. या सामन्यात आरसीबीसाठी यष्टीरक्षक-फलंदाज ऋचा घोष हिने आक्रमक फलंदाजी करत 90 धावांची शानदार खेळी साकारली. मात्र, तिची ही झुंजार खेळी संघाला विजय मिळवून देण्यासाठी अपुरी ठरली. याच सामन्यात मुंबईकडून नॅट सिव्हर-ब्रंट हिने दमदार शतक झळकावले आणि WPL इतिहासातील शतक करणारी पहिली खेळाडू ठरण्याचा मान मिळवला.
ऋचा घोषच्या खेळीचे कौतुक करताना स्मृती म्हणाली, “ऋचाने खेळलेली खेळी अप्रतिम होती. तीची फलंदाजी पाहणे खरोखरच आनंददायी होते. नादिननेही चांगले योगदान दिले. पराभव झाल्यावर अशा खेळींकडे फारसं लक्ष जात नाही, पण माझ्या मते ही मी पाहिलेल्या सर्वोत्तम खेळींपैकी एक होती.”
नॅट सिव्हर-ब्रंटबाबत बोलताना मानधनाने तिला वर्ल्ड-क्लास खेळाडू म्हटले. “ती एकाच चेंडूला तीन वेगवेगळ्या दिशांना मारू शकते, ज्यामुळे गोलंदाजांसाठी ती फारच धोकादायक ठरते. 25-30 धावांनंतर तिने ज्या पद्धतीने गती वाढवली, ती प्रत्येक युवा खेळाडूने पाहावी आणि शिकावी,” असे मानधना म्हणाली.
गोलंदाजीबाबत बोलताना मानधनाने कबूल केले की पहिल्या पाच सामन्यांत आरसीबीची गोलंदाजी उत्कृष्ट होती, मात्र या सामन्यात काही गोलंदाज योग्य लाईन-लेंग्थ ठेवू शकल्या नाहीत. “टी20 क्रिकेटमध्ये चांगले आणि वाईट दोन्ही दिवस येतात. लॉरेन बेलने नव्या चेंडूने चांगली गोलंदाजी केली, नादिननेही कठीण षटके टाकली. मात्र, संघ म्हणून आम्हाला अजून काही बाबींवर काम करण्याची गरज आहे,” असेही तिने नमूद केले.






