इंडियन प्रीमियर लीग २०२१ मध्ये आज (रविवार, १८ एप्रिल) पहिल्यांदा डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) खेळली जात आहे. यातील पहिला सामना एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने ३८ धावांनी जिंकला आहे. हा बेंगलोरचा सलग तिसरा विजय आहे.
बेंगलोरने या सामन्यात कोलकाता समोर २०५ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताला २० षटकात ८ बाद १६६ धावाच करता आल्या.
कोलकाताकडून आंद्रे रसलने सर्वाधिक ३१ धावांची खेळी केली. तसेच शाकिब अल हसन(२६), ओएन मॉर्गन(२९), राहुल त्रिपाठी(२५) आणि शुबमन गिल(२१) यांनी २० धावांचा आकडा ओलांडला. मात्र, कोणालाही चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे कोलकाता संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
बेंगलोरकडून काईल जेमिसनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच हर्षल पटेल आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. वॉशिंग्टन सुंदरने १ विकेट घेतली.
बेंगलोरच्या २०४ धावा
बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद २०४ धावा केल्या आहेत आणि कोलकाताला २०५ धावांचे आव्हान दिले आहे.
बेंगलोरकडून पडीक्कल बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलला साथ देण्यासाठी एबी डिविलियर्स आला. त्यानेही मॅक्सवेलसह सुरुवातीपासूनच आक्रमक खेळण्यास सुरुवात केली. मात्र, या दोघांची ५३ धावांची भागीदारी मॅक्सवेल हरभजन सिंगच्या गोलंदाजीवर बाद झाल्याने संपली. मॅक्सवेलने ४९ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांसह ७८ धावांची खेळी केली.
मॅक्सवेल बाद झाल्यानंतरही डिविलियर्सने त्याचा आक्रमक अंदाज कायम ठेवत चौकार षटकारांची बरसात केली आणि अर्धशतकही पूर्ण केले. त्याने २० व्या षटकात तब्बल २१ धावा वसूल केल्या. त्यामुळे बेंगलोरने २०० धावांचा टप्पा सहज पार केला. २० षटकांच्या अखेर डिविलियर्स ३४ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांसह ७६ धावांवर नाबाद राहिला. तसेच काईल जेमिसन ११ धावांवर नाबाद राहिला.
कोलकाताकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच प्रसिद्ध कृष्णा आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी १ विकेट घेतली.
मॅक्सवेलच्या अर्धशतकाने सावरले आरसीबीला
या सामन्यात बेंगलोरकडून कर्णधार विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल सलामीला उतरले. मात्र, दुसऱ्याच षटकात विराट ५ धावा करुन वरुण चक्रवर्तीविरुद्ध बाद झाला. त्यापाठोपाठ रजत पाटीदारही त्याच षटकात १ धाव करुन माघारी परतला. त्यामुळे बेंगलोर संघ अडचणीत सापडला होता. पण असे असतानाच पडीक्कलसह चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने आक्रमक खेळ करत संघाचा डावा सावरला.
त्याने २८ चेंडूत ९ व्या षटकात आपले सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले. तसेच त्याची आणि पडीक्कलची अर्धशतकी भागीदारीही पूर्ण झाली. मात्र, मॅक्सवेलला साथ देणारा पडीक्कल १२ व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर २५ धावा करुन बाद झाला.
विराटने जिंकली नाणेफेक
सामन्यापुर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये नाणेफेक झाली असून बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबरोबरच दोन्ही संघांनी आपापली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. कोलकाता संघाच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये कसलाही बदल करण्यात आलेला नाही. त्यांचा संघ मागील सामन्याप्रमाणे आहे. बेंगलोर संघात एक प्रमुख बदल करण्यात आला आहे. डेनियल क्रिश्चियनला डच्चू देत युवा खेळाडू रजत पाटीदारला पुन्हा संधी देण्यात आली आहे.
#RCB have won the toss and they will bat first against #KKR in Match 10 of #VIVOIPL.
Follow the game here – https://t.co/OBmT3wfu6G pic.twitter.com/mYaZUcG5WQ
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2021
असा आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ-
विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पड्डीकल, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, काइल जेमीसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल
असा आहे कोलकाता नाईट रायडर्स संघ-