सर्व युरोपीयन क्लब साठी प्रतिष्ठेची असलेल्या युएफा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम ८ मध्ये स्थान मिळवण्यासाठीच्या पहिल्या लेगच्या सामन्यांचा शेवट आज होईल. आज शेवटचे २ सामने सेविल्ला विरुद्ध मॅन्चेस्टर युनाएटेड तर शक्तार विरुद्ध रोमा असे होतील.
अंतिम ८ साठी झालेल्या सर्व सामन्यात रियल मॅड्रिड विरुद्ध पॅरिस सेंट जर्मन आणि चेल्सी विरुद्ध बार्सेलोना या सामन्यांकडे सर्वांचे लक्ष होते. लीग मध्ये सातत्याने चांगला खेळ करण्यात अपयशी ठरलेल्या रियल मॅड्रिड समोर पीएसजीचे तगडे आव्हान होते तर चेल्सी विरुद्ध २०१२च्या पराभवचा वचपा काढण्यास बार्सेलोना उत्सुक होती.
रियल मॅड्रिडच्या घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात पीएसजी तर्फे ३१ व्या मिनिटाला राबिओटने गोल करत रियलला धक्का दिला. पहिल्या हाफच्या शेवट पेनल्टी बाॅक्स मध्ये क्रुस पडला आणि रियलला पेनल्टी मिळाली. त्याचा पुरेपुर फायदा घेत रोनाल्डोने गोल केला आणि सामना १-१ ने बरोबरीत आणला.
दुसऱ्या हाफला दोन्ही संघांनी सामन्यावर पकड मिळवायचा प्रयत्न केला आणि शेवटच्या १० मिनिटात ॲसेन्सियोच्या पासवर रोनाल्डोने गोल करत सामन्यात २-१ ची महत्वपूर्ण बढत मिळवून दिली. ८६ व्या मिनिटाला पुन्हा एकदा ॲसेन्सियोने संधी निर्माण केली आणि मार्सेलोने त्याचे गोल मध्ये रुपांतर करुन रियलला पहिल्या लेग मध्ये ३-१ ने विजय मिळवून दिला. दुसऱ्या लेगचा सामना ७ मार्चला पीएसजीच्या मैदानावर होणार आहे.
चेल्सी विरुद्ध बार्सेलोना सामना काल लंडन मध्ये चेल्सीच्या घरच्या मैदानावर झाला. मेस्सीला चेल्सी विरुद्ध ८ सामने खेळून सुद्धा एकही गोल करण्यात यश मिळाले नव्हते त्यामुळे मेस्सी गोल करेल का यावर सगळ्यांच्या नजरा होत्या. पहिल्या हाफ पासूनच बार्सेलोनाने बाॅलवर ताबा ठेवला परंतु त्यांना गोलची संधी निर्माण करण्यात अपयश येत होते तर चेल्सीचा दोनदा बाॅल गोलपोस्टला लागून परत आला.
पहिला हाफ गोलविरहित सुटल्यानंतर दुसऱ्या हाफला बार्सेलोनाच्या चुकीचा फायदा घेत विलियनने ६२ व्या मिनिटाला हजार्डच्या पासवर गोल केला आणि १-० अशी बढत मिळवली. यानंतर बार्सेलोनाने आक्रमक पवित्रा घेतला आणि ७५ व्या मिनिटाला क्रिस्टियनच्या चुकीच्या पासचा इनिएस्टाने फायदा घेतला आणि मेस्सीला पास दिला ज्याचे त्याने गोल मध्ये रुपांतर करत चेल्सी विरुद्ध आपला पहिला गोल नोंदवला.
या गोल बरोबरच सामना १-१ ने बरोबरीत सुटला आणि बार्सेलोनाने अवे गोलची महत्वपूर्ण बढत घेतली. पुढचा सामना बार्सेलोनाच्या मैदानावर १५ मार्चला असेल.
इतर सामन्यांचे निकाल खालील प्रमाणे:
जुवेंटस २-२ टोट्टेन्हम हाॅटस्पर
बसील ०-४ मॅन्चेस्टर सिटी
पोर्टो ०-५ लीवरपुल
बायर्न मुनिच ५-० बेसिक्टास