इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) १४ च्या पर्वाचा लिलाव येत्या १८ फेब्रुवारी रोजी होणार असून यासाठी अनेक दिग्गज खेळाडू लिलावात उतरणार आहेत. यात भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग हा देखील लिलावात असणार आहे. त्याने २ कोटी रुपये त्याची आधारभूत किंमत लिलावासाठी ठेवली आहे.
तो मागीलवर्षी आयपीएलमध्ये खेळला नव्हता. काही वैयक्तिक कारणाने माघार घेत असल्याचे त्यावेळी त्यानं सोशल मीडियाद्वारे जाहीर केले होते. हरभजन मागील ३ वर्षापासून चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता. पण यंदा त्यांनी त्याला लिलावाआधी मुक्त केले.चेन्नई सुपर किंगने २०१८ साली हरभजन सिंगला दोन कोटींमध्ये खरेदी केले होते.
त्याने कौटुंबिक कारणामुळे मागीलवर्षी आयपीएलमधून माघार घेतली होती असे सांगितले होते, परंतु त्यामागील मुख्य कारण क्रीकबजने विचारले असता आपण का माघार घेतली आहे याचे उत्तर देत तो म्हणाला की, “कोरोना महामारीमूळे मला माझ्या कुटुंबातील सदस्यांची चिंता होती. यामुळे मी मागील हंगामात खेळण्यास नकार दिला होता. माझा हा निर्णय अचूक होता असे मला वाटते. मी आता २०२१ च्या आयपीएलसाठी पूर्णपणे सज्ज असून त्यासाठी मी कठोर मेहनतसुद्धा घेत आहे. माझ्यामध्ये क्रिकेट अजूनही शिल्लक आहे.”
यंदाच्या आयपीएल लिलावाआधी चेन्नईने मुक्त केलेल्या ६ खेळाडूंपैकी हरभजन सिंग हा एक होता. त्यामुळे आता १८ फेब्रुवारीला होणाऱ्या लिलावात हरभजन सिंगवर कोणता संघ बोली लावणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यंदाच्या आयपीएलच्या लिलावात एकूण १०९७ खेळाडूंनी नाव नोंदणी केली आहे. ज्यात ८१४ भारतीय आणि २८३ विदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित-विराटसारखे दिग्गज संघात असूनही टीम इंडिया का झाली पराभूत? जाणून घ्या पाच ठळक कारणं
इंग्लंडविरुद्ध दारुण पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया, म्हणतोय…






