---Advertisement---

या 4 कारणांमुळे 2003 विश्वचषक ठरला जगातील आजपर्यंतचा सर्वश्रेष्ठ क्रिकेट विश्वचषक

On: गुरूवार, मार्च 23, 2023 9:55 AM
Australia
---Advertisement---

साल 2003 ला दक्षिण आफ्रिका, केनिया आणि झिम्बाब्वेमध्ये 8 वा वनडे विश्वचषक पार पडला होता. त्यावेळी पहिल्यांदाच विश्वचषकात 14 संघांचा सहभाग होता. ऑस्ट्रेलिया रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखाली गतविजेता म्हणून या विश्वचषकात खेळणार होता. या विश्वचषकादरम्यान 54 सामने खेळण्यात आले होते. हा विश्वचषक रिकी पाँटिंगच्या नेतृत्त्वातील ऑस्ट्रेलिया संघाने बरोबर 20 वर्षांपूर्वी भारताला पराभूत करत जिंकला होता.

या विश्वचषकासाठी 14 संघांची 2 गटात विभागणी करण्यात आली होती. या दोन गटातील प्रत्येकी अव्वल 3 संघ सुपर सिक्स फेरीमध्ये खेळले. या विश्वचषकात अनेक धक्कादायक निकाल लागले. यजमान दक्षिण आफ्रिकेचा संघ श्रीलंकेविरुद्ध डकवर्थ लूईस नियमामुळे 1 धावेने पराभूत होऊन साखळी फेरीतूनच बाहेर पडला. तर इंग्लंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज अशा मोठ्या संघांचेही आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले.

या विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया या २ संघांनी अंतिम फेरी गाठली. 23 मार्च 2003 रोजी झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत तिसरा विश्वचषक जिंकला. या विश्वचषकात खेळाडूंची गुणवत्ता पाहायला मिळाली आणि मनोरंजनही झाले. त्यामुळे हा एक सर्वोत्तम विश्वचषकांपैकी एक विश्वचषक ठरला.

2003 चा विश्वचषक सर्वोत्तम ठरण्यामागील 4 कारणे –
1. सचिन तेंडूलकरचा अफलातून फॉर्म –
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर या विश्वचषकादरम्यान अफलातून फॉर्ममध्ये होता. त्याच्या या फॉर्ममुळे अनेकांचे लक्ष त्याने या विश्वचषकाकडे वळवले होते. या विश्वचषकात सचिनने सलग 4 वेळा 50 पेक्षा अधिक धावांची खेळी केली. यामध्ये त्याने त्याची विश्वचषकातील 151 धावांची सर्वोच्च वैयक्तिक खेळीही केली. ही खेळी त्याने नामिबिया विरुद्ध खेळताना केली.

त्याने झिम्बाब्वे विरुद्ध 81 धावांची खेळी, इंग्लंडविरुद्धही अर्धशतकी खेळी, पाकिस्तानविरुद्ध 98 धावांची महत्त्वपूर्ण खेळी या विश्वचषकात केली. तसेच सुपर सिक्सच्या फेरीत त्याने श्रीलंकेविरुद्ध 97 धावा केल्या. तर उपांत्यसामन्यात केनियाविरुद्ध त्याने 83 धावा करत भारताला अंतिम सामन्यात पोहचवण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याने या विश्वचषकात सर्वाधिक 673 धावा करताना मालिकावीराचा पुरस्कारही मिळवला. त्यावेळी त्याने एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही केला.

2. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना –
अनेक वर्षांपासून कट्टर प्रतिस्पर्धी असणारे भारत आणि पाकिस्तान संघ 2003 च्या विश्वचषकातही आमने-सामने आले होते. हा सामना जेव्हाही होतो, तेव्हा मैदानावरील प्रेक्षकांबरोबरच घरोघरी टीव्हीवरही हा सामना पहाण्यासाठी चाहते उत्सुक असतात. 2003 च्या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान संघात साखळी फेरीमध्ये सामना झाला होता. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज सईद अन्वरने 101 धावांची शतकी खेळी करत पाकिस्तानला 273 धावसंख्या उभारुन देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता.

त्यानंतर 274 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडूलकर यांची जोडी सलामीला मैदानात उतरली. त्या दोघांनीही आक्रमक सुरुवात केली. दोघांनीही सुरेख अप्परकटचे फटके खेळताना षटकार खेचले. भारताने 5 षटकात 50 धावा केल्या होत्या. पण सेहवाग आणि नंतर भारताचा कर्णधार सौरव गांगुली लागोपाठ बाद झाले. असे असले तरी सचिन एका बाजूने खेळत होता. पण तो शतकासाठी केवळ 2 धावा बाकी असताना 98 धावांवर बाद झाला. पण नंतर युवराज सिंग आणि राहुल द्रविडने उर्वरित धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या पूर्ण करत सामना भारताला जिंकून दिला.

3. दोन सर्वोत्तम संघांचा अंतिम सामन्यात प्रवेश –
या विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकवेळी चांगली कामगिरी करत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. ऑस्ट्रेलिया या विश्वचषकात एकही सामना पराभूत न होता अंतिम सामन्यात पोहचला होता. तर भारत त्याआधी केवळ ऑस्ट्रेलिया विरुद्धच पराभूत झाली हाता. अंतिम सामन्यात गांगुलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्विकारली.

मात्र या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे फलंदाज अव्वल फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटिंगने 121 चेंडूत 140 धावांची खेळी करताना 8 षटकार मारले. त्याच्या या आक्रमक शतकामुळे आणि त्याला अन्य फलंदाजांच्याही चांगल्या खेळीची जोड मिळाल्याने ऑस्ट्रेलियाने 359 धावांचा डोंगर उभा केला आणि भारताला 360 धावांचे आव्हान दिले.

या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने सचिनची विकेट लवकर गमावली. ग्लेन मॅकग्राने पहिल्याच षटकात बाद केले. त्याच्यानंतर भारताने नियमित अंतराने विकेट्स गमवायला सुरुवात केली. एक बाजू सेहवागने सांभाळली होती. मात्र तोही ८२ धावा करुन धावबाद झाला. अखेर भारताचा डाव 324 धावांवर संपूष्टात आला आणि ऑस्ट्रेलियाने 125 धावांनी सामना जिंकत तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले.

4. अनपेक्षित निकाल –
एकीकडे दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज सारखे संघ साखळी फेरीतच बाहेर पडले, तिथे दुसरीकडे केनिया आणि झिम्बाब्वे सारख्या संघांनी सुपर सिक्समध्ये धडक मारली होती. केनियाने साखळी फेरीत श्रीलंका, बांगलादेश संघाला पराभवाचा धक्का दिला होता. तसेच केनियाने झिम्बाब्वेला सुपर सिक्सच्या फेरीत पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.

त्यावेळी कसोटीचा दर्जा नसतानाही विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारा केनिया पहिला संघ ठरला होता. त्यांना उपांत्य सामन्यात भारताविरुद्ध 91 धावांनी पराभूत व्हावे लागले होते. त्या सामन्यात भारताचा कर्णधार गांगुलीने शतक केले होते. पण त्या विश्वचषकात केनियाने केलेल्या कामगिरीमुळे त्यांनी चाहत्यांची मने जिंकली होती.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेटमध्ये 20 वर्षांपूर्वी घडली होती ‘ती’ दु:खद घटना; बॉथमसोबत तुलना होत असलेल्या 24 वर्षीय खेळाडूने गमावला होता जीव
प्रतिभा असूनही भारतीय संघासाठी दुसरी संधी न मिळालेला कमनशिबी शिलेदार ‘अतुल वासन’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---