सध्या सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यातील पहिला डाव भारतीय संघासाठी निराशाजनक राहिला. मात्र दुसऱ्या डावात भारतीय संघाने दमदार पुनरागमन केले. त्यामुळे भारतीय संघ सध्या मजबूत स्थितीत पोहोचला आहे. यादरम्यान रोहित शर्माने १२७ धावांची शानदार खेळी केली. त्याला पुजाराने देखील चांगली साथ दिली होती. मात्र रोहितने केलेले हे शतक एका कारणामुळे खास आहे. ते म्हणजे रोहितने जेव्हाही कसोटी सामन्यात शतक केले आहे, तेव्हा भारतीय संघाने तो सामना जिंकला आहे.
रोहितच्या शतकाशी भारतीय संघाच्या विजयाचे असे राहिले आहे समीकरण
रोहितने २०१३ साली वेस्टइंडिज विरुद्ध कोलकातामध्ये आपल्या कसोटी सामन्यातून पदार्पण केले होते. तेव्हा रोहितने पहिल्या डावात १७७ धावा केल्या होत्या. भारताने तो सामना एक डाव आणि ५१ धावांनी जिंकला होता. त्यानंतर मुंबईमधील कसोटी सामन्यात २०१३ साली रोहितने नाबाद १११ धावा केल्या होत्या. हा सामना देखील भारताने एक डाव आणि १२६ धावांनी जिंकला होता. त्यावेळी रोहितने आपल्या पहिल्याच कसोटी मालिकेत मालिकावीराचा पुरस्कार मिळवला होता.
त्यानंतर रोहितला कसोटीमधील आपले तिसरे शतक करायला ४ वर्ष लागले. मात्र २०१७ मध्ये रोहितने नागपूरच्या कसोटी सामन्यात श्रीलंका विरुद्ध १०२ धावा केल्या होत्या. तेव्हा भारताने हा सामना एक डाव आणि २३९ धावांनी जिंकला होता.
त्यानंतर २०१९ मध्ये रोहितने प्रथमच सलामीवीर म्हणून जबाबदारी सांभाळली. तेव्हा विशाखापटनमच्या कसोटी सामन्यात सलामीला येत रोहितने पहिल्या डावात १७६ धावा केल्या होत्या. तर दुसर्या डावात रोहितने १२७ धावा केल्या होत्या. हा सामना भारतीय संघाने २०३ धावांनी आपल्या खिशात टाकला होता.
त्यानंतर याच मालिकेतील तिसरा कसोटी सामना रांचीमध्ये खेळवला गेला होता. त्या सामन्यात रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले होते. रोहितने त्या सामन्यात २१२ धावांची खेळी केली होती. या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला एक डाव आणि २०२ धावांनी पराभूत केले होते. आणि रोहितच्या शानदार खेळीमुळे रोहितला पुन्हा या मालिकेत मालिकावीराचा पुरस्कार मिळाला होता.
रोहितने कसोटीमध्ये सातवे शतक याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात चेन्नईमध्ये इंग्लंड विरुद्ध लावले होते. रोहितने या सामन्यात १६१ धावांची खेळी केली होती आणि भारताने इंग्लंडला तब्बल ३१७ धावांनी पराभूत केले होते. तसेच रोहितने सध्या सुरू असलेल्या या सामन्यात देखील शतक लगावले आहे. त्यामुळे आतापर्यंतची आकडेवारी पाहता हा सामना भारतीय संघ जिंकेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पहिल्या डावात भारतीय संघ ९९ धावांनी पिछाडीवर पडला होता. मात्र रोहितने केएल राहुल (४६) सोबत ८३ धावांची सलामीची भागीदारी केली. त्यानंतर पुजाराने(६१) देखील रोहितची साथ देत भारतीय संघाचा डाव सावरला आणि दीडशतकी भागीदारी केली. रोहितने १२७ धावा केल्या.
त्यानंतर रिषभ पंत (५०) आणि शार्दुल ठाकूर (६०) यांनी देखील अर्धशतके झळकावली. त्यामुळे भारताने दुसऱ्या डावात ४६६ धावा केल्या आणि ३६७ धावांच्या आघाडीसह इंग्लंडसमोर ३६८ धावांचे आव्हान ठेवले.
महत्त्वाच्या बातम्या –
–मोठी बातमी! रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षणासाठी उतरणार नाही, ‘हे’ आहे कारण
–टोकियो पॅरालिम्पिकची सांगता! भारताने १९ पदकांसह रचला इतिहास, पदकतालिकेत देशाला मिळाला ‘हा’ क्रमांक
–स्वत:च्याच विकेटवर वैतागला विराट, आऊट होऊन ड्रेसिंग रुममध्ये परतताच केले असे काही, पाहा व्हिडिओ