गेली अनेक वर्ष एमएस धोनीने भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली होती. त्यानंतर २०१७ मध्ये त्याने वनडे संघाची जबाबदारी विराट कोहलीकडे सोपविलेली. जेव्हापासून विराट कोहलीने संघाचे कर्णधारपद स्विकारले आहे, तेव्हापासून भारतीय संघाने परदेशात जाऊन देखील मालिका जिंकल्या आहेत. भारतीय संघात एक वेगळा उत्साह निर्माण झाला होता. आता विराटचा हा प्रवास संपला आहे. काही दिवसांपूर्वी त्याने टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता त्याचे वनडे संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले आहे. तो फक्त कसोटी संघाचे नेतृत्व करताना दिसेल. तर वनडे आणि टी२० संघाची धुरा रोहित शर्माच्या हाती देण्यात आली आहे. चला तर पाहूया कर्णधार म्हणून कशी होती विराट कोहलीची कारकीर्द.
विराट कोहलीने कर्णधार म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ९५ सामने खेळले. ज्यामध्ये भारतीय संघाला ६५ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले. तर केवळ २७ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्याची विजयाची सरासरी ६८ टक्के होती, जी भारतीय क्रिकेट इतिहासात आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट सरासरी आहे.
विजय मिळवण्याच्या सरासरीच्या बाबतीत तो जगातील चौथा सर्वोत्कृष्ट कर्णधार आहे. वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार क्लाइव्ह लॉयड यांनी ७७.७१ च्या सरासरीने सामने जिंकले होते. तर, ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगने ७६.१४ च्या सरासरीने सामने जिंकलेले. तसेच ७३.७० च्या सरासरीसह दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिए या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.
विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९ पैकी १५ मालिकांमध्ये विजय मिळवला होता. यापैकी मायदेशात त्याने ९ पैकी ८ मालिका आपल्या नावावर केल्या. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन २-१ वनडे मालिकेत विजय मिळवला. तर दक्षिण आफ्रिकेत ५-१, वेस्ट इंडीजमध्ये ३-१ ने विजय मिळवला. तसेच न्यूझीलंड, श्रीलंका, झिम्बाब्वे व बांगलादेशमध्ये जाऊन देखील विराट कोहलीने भारतीय संघाला विजय मिळवून दिले.
तसेच कर्णधार म्हणून फलंदाजी करताना देखील त्याने अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने ९५ सामन्यांमध्ये ७२.६५ च्या सरासरीने ५४४९ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने २१ शतक आणि २७ अर्धशतके झळकावली होती. सर्वाधिक शतक झळकावण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या स्थानी असून, पहिल्या स्थानी २२ शतकांसह रिकी पाँटिंग आहे.
महत्वाच्या बातम्या:
साजिद खानने बांगलादेशी फलंदाजांची पळता भुई थोडी, पाकिस्तानचा दुसरी कसोटी जिंकत मालिकेवर कब्जा
ब्रेकिंग! दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघाची घोषणा, रहाणेची उपकर्णधारपदावरुन गच्छंती