इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम मंगळवारी (४ मे) स्थगित करण्यात आला. स्पर्धा सुरु असतानाच कोरोना व्हायरसचा अचानक संघांच्या बायोबबलमध्ये प्रवेश झाला. त्यामुळे ही स्पर्धा २९ सामन्यांनतर स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआय आणि आयपीएल कमीटीने घेतला.
आयपीएलचा हा हंगाम स्थगित झाल्यानंतर आता उर्वरित स्पर्धेचे काय हा प्रश्न उभा राहिला आहे. कारण भारतीय क्रिकेटपटूंचे पुढील वेळापत्रक बरेच व्यस्त आहे. त्यामुळे आता आयपीएच्या उर्वरित स्पर्धा खेळवायची म्हटली तरी कुठे आणि कधी खेळवणार हा मोठा प्रश्न आहे. दरम्यान, असे वृत्त समोर येत आहे की इंग्लंडमधील एका काऊंटी ग्रुपने सप्टेंबरमध्ये आयपीएल २०२१ चा उर्वरित हंगामाचे आयोजन करण्याची इच्छा दर्शवली आहे.
एमसीसी, सरे आणि वॉरविकशायर अशा काऊंटी संघांच्या ग्रुपने इंग्लंड क्रिकेट बोर्डाला पत्र लिहून आयपीएलचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार आयसीसीच्या एनसीई (नॅशनल चीफ एक्झिक्युटिव्ह) आभासी बैठकीतही या प्रकरणावर चर्चा केली जाईल. तसेच आयपीएलचा हंगाम आयोजित करण्याव्यतिरिक्त टी२० विश्वचषकासाठी खेळाडूंना याची मदत होईल असेही काऊंटी ग्रुपचे म्हणणे आहे.
त्याचबरोबर जर भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी२० विश्वचषक आयोजित करणे शक्य झाले नाही तर ही स्पर्धा युएईमध्ये होणार आहे. त्यामुळे जर आयपीएल २०२१ चा उर्वरित हंगाम इंग्लंडमध्ये झाल्यास युएईतील खेळपट्ट्या विश्वचषकासाठी ताज्या राहतील.
असे असले तरी अजून आयपीएलच्या आयोजनाबाबत किंवा टी२० विश्वचषकाबद्दलही कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. हे निर्णय येत्या काही महिन्यांत घेतले जातील.
सध्या तरी अशी चर्चा आहे की टी२० विश्वचषकापूर्वी सप्टेंबरमध्ये काही काळ रिकामा असल्याने त्यावेळी आयपीएल २०२१ चे आयोजन होऊ शकते. पण त्यासाठी अन्य आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डांशीही चर्चा करावी लागेल. तसेच इंग्लंडमधील नियमांचाही विचार करावा लागेल.
तरी, एक शक्यता अशी आहे की भारतीय संघ जूनमध्ये इंग्लंडला जाणार आहे. कारण भारताला इंग्लंडमध्ये जूनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. तसेच ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान भारत आणि इंग्लंड संघात कसोटी मालिका होणार आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये बरेच स्टार खेळाडू इंग्लंडमध्येच असणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
आठवणीतील सामना! जेव्हा रोहित शर्माने आयपीएलमध्ये घेतली होती हॅट्रिक, वाचा त्या सामन्याबद्दल सविस्तर