भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी टीम मॅनेजमेंटकडे खास विनंती केली आहे. त्यांनी सांगितले की एजबेस्टनच्या कसोटीत प्रसिद्ध कृष्णा किंवा मोहम्मद सिराज या दोघांपैकी कोणाला तरी अंतिम 11 मध्ये स्थान मिळायला हवं, मात्र सध्याच्या फॉर्मनुसार प्रसिद्ध कृष्णा अधिक योग्य पर्याय वाटतोय.
ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना मांजरेकर म्हणाले, “सिराज हा अनुभवी आणि जोशपूर्ण गोलंदाज आहे. हेडिंग्ले येथे त्याने उत्कृष्ट स्पेल टाकला होता. पण सध्याची परिस्थिती पाहता कठोर निर्णय घ्यावे लागतील. माझ्या मते प्रसिद्ध कृष्णाला गोलंदाजीसाठी जबाबदारी देणं योग्य ठरेल.”
त्यांनी पुढे म्हटलं, “शुबमन गिलसाठी प्रसिद्ध कृष्णा असा गोलंदाज वाटतोय, जो विकेट घेऊ शकतो. त्यामुळे ही निवड कठीण असली तरी आवश्यक आहे.”
याचसोबत मांजरेकर यांनी शार्दुल ठाकुरऐवजी नीतीश कुमार रेड्डीला संघात घ्यावं असा सल्लाही दिला. तसेच एका वेगवान गोलंदाजाला विश्रांती देऊन त्याच्या जागी फिरकीपटू कुलदीप यादवला संधी द्यावी, असंही ते म्हणाले.
दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोट्यांच्या मालिकेतील पहिला सामना लीड्स येथे खेळला गेला होता. या सामन्यात भारताने दोन्ही डावांत मिळून पाच शतक झळकावले, तरीही इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे इंग्लंडला मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळाली आहे. एजबेस्टनमधील ऐतिहासिक आकडेवारी पाहता, भारताला येथे अजूनही कसोटीत विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे टीम इंडियासाठी ही कसोटी निर्णायक ठरणार आहे.