शनिवारपासून(19 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डीयम, रांची येथे होणार आहे. या सामन्याआधी बोलताना दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिस म्हणाला, रिव्हर्स स्विंग आणि फिरकी या कसोटीत महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.
फाफ डू प्लेसिस म्हणाला, ‘तूम्हाला शक्य तितकी तयारी करणे महत्त्वाचे असते. मला वाटते खेळपट्टी फिरकीसाठी चांगली असेल. मी खेळपट्टी पाहिली, ती सुकलेली आणि टणक वाटली. त्यामुळे मला वाटते रिव्हर्स स्विंग आणि फिरकी गोलंदाजी या कसोटीत महत्त्वाचा घटक ठरणार आहे.’
तसेच डू प्लेसिस म्हणाला, ‘आम्हाला पहिल्या डावात मोठ्या धावा करणे गरजेचे आहे. तूम्ही जेव्हा पहिल्या डावात धावा करता तेव्हा त्यानंतर काहीही शक्य होऊ शकते. आमच्यासाठी पहिल्या डावातील धावा महत्त्वाच्या आहेत आणि नंतर दुसऱ्या डावात काहीही होऊ शकते.’
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत सध्या भारतीय संघ पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवून 2-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला शेवटचा कसोटी सामन्यात जिंकून प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान आहे.