---Advertisement---

मी भारतात येईल की नाही माहित नाही, परंतू माझी मुलं मात्र भारताविरुद्ध क्रिकेट नक्की खेळतील

On: गुरूवार, ऑगस्ट 20, 2020 8:07 PM
---Advertisement---

२००६ ला स्टुअर्ट क्लार्क हा ऑस्ट्रेलियाकडून कसोटी खेळणारा दुसरा अँग्लो-इंडियन क्रिकेटपटू ठरला होता. पण त्याच्याआधी जो पहिला अँग्लो क्रिकेटपटू होता, तो म्हणजे रेक्स सेलर. २० ऑगस्ट १९४० ला गुजरातमधील बुसरस (आत्ताचे वलसाड) येथे रेक्स सेलरचा जन्म झाला होता. तो विल्यम अल्फ्रेड आणि इर्ने इथेल सेलर यांचा दुसरा मुलगा. त्यांच्या कुटुंबाचे मुळ हे भारतीय आणि ब्रिटिश होते. तसेच त्या काळात भारतात ब्रिटिशांचे राज्य होते. पण त्यावेळी रेक्सचे वडील ब्रिज इंस्पेक्टर म्हणून भारतीय रेल्वेमध्ये कामाला होते. त्यामुळे रेक्सच्या बालपणीचे सुरुवातीचे दिवस बाँबेतील (आत्ताची मुंबई) रेल्वे कॉलनीत गेले होते.

जरी त्यांचे कुटुंब अँग्लो-इंडियन असले तरी रेक्स आणि त्याचा मोठा भाऊ बासिल त्यांच्या वडीलांच्या कमी वेतनामुळे शाळेत जाऊ शकत नव्हते. तसेच पुढे काही दिवसांनी भारत-पाकिस्तानच्या फाळणीवेळी या कुंटुंबाने भविष्यात काय करायचे याचा निर्णय घेण्यासाठी चर्चा केली. त्यात मुलांचे शिक्षण हा महत्त्वाचा मुद्दा होता. अखेर त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. पण ऑस्ट्रेलियातील वातावरण जर सर्वांना मानवले नाही तर काय म्हणून विल्यम्स भारतातच थांबले आणि इर्ने व दोन्ही मुले ऑस्ट्रेलियाला गेली.

जाताना जहाजात त्यांची ओळख सीसी शिंकफिल्ड यांच्याशी झाली. ते किंग्स कॉलेजचे मुख्याध्यापक होते. त्याचा फायदा असा झाला की बासिक आणि रेक्स या दोघांनाही ऍडलेडमधील विद्यालयात प्रवेश मिळाला. पुढे काही दिवसात सेलर कुटुंब ऑस्ट्रेलियात स्थिरस्थावर झाल्यावर विल्यम रेल्वेची नोकरी सोडून कुटुंबाबरोबर रहायला ऍडलेडला आले. यावेळी रेक्सने घरी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. काही दिवसातच त्याच्यातील खेळाची क्षमता त्याच्या शाळकरी मित्रांनी ओळखली. त्याने १३ वर्षांखालील शाळेच्या संघात वयाच्या ८-९ व्या वर्षी स्थान मिळवले आणि पुढे शाळेच्या वरिष्ठ संघाचे कर्णधारपदही सांभाळले.

पुढे रेक्सला माजी क्रिकेटपटू गॉफ नॉब्लेटचे मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रेक्स चांगली कामगिरी करत होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो केन्सिंग्टन क्रिकेट क्लब, ऍडलेड साठी खेळला (ब्रिजटाऊनमध्ये असलेलेल केन्सिंग्टन ओव्हल नाही.). रेक्स वयाच्या १९ व्या वर्षी १९५९ ला दक्षिण ऑस्ट्रेलिया संघाच्या निवडचाचणीसाठी गेला. नंतर त्याने न्यू साऊथ वेल्सविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून पदार्पणही केले. पण या सामन्यात दक्षिण ऑस्ट्रेलियाला एका डावाने पराभवाचा सामना करावा लागला. रेक्सने पहिल्या डावात २ विकेट्स घेतल्या आणि त्याने दोन्ही डावात अनुक्रमे ८ आणि २३ धावा केल्या.

त्याचा संघ सहकारी लेस फॅवेलने त्याला ‘साहिब’ असं टोपननाव दिलं होते. पुढे फॅवेलने दक्षिण ऑस्ट्रेलियाचे ९५ सामन्यात नेतृत्व केले, हा अजूनही विक्रम आहे. रेक्सने पहिले प्रथम श्रेणी अर्धशतक पश्चिम ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९५९-६० ला केले होते. रेक्स पहिल्यांदा पुढील मोसमात पहिला आंतरराष्ट्रीय संघाविरुद्ध सामना खेळला. वेस्ट इंडिजने ऍडलेडमध्ये दक्षिण ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना खेळला होता. त्यावेळी रेक्सने वेस हॉल, एल्फ वॅलेंटाईन, लान्स गिब्स, गॅरी सोबर्स अशा गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध २१ धावा केल्या. तसेच नंतर ४ विकेट्सही घेतल्या. पण नंतर रेक्सने थोडा ब्रेक घेतला आणि त्याने माजी संघसहकारी हॉवार्ड मटनकडून मार्गदर्शन घेतलं. तो सकाळी नेट सेशनमध्ये सराव करु लागला. पुढच्याच मोसमात त्याच्या गोलंदाजीमध्ये बदल दिसले. तो चांगला लूप, फ्लाईट आणि स्पिन करु लागला.

त्याने त्याचा २६ वा सामना खेळत असताना पहिल्यांदा एका डावात ५ विकेट्स घेतल्या. १९६३-६४ च्या मोसमात मेलबर्न येथे विक्टोरियाविरुद्ध त्याने हा कारनामा केला. तसेच त्या सामन्यात रेक्सने दुसऱ्या डावातसुद्धा ३ विकेट्सही घेतल्या होत्या. तसेच नाबाद ३१ धावाही केल्या. त्याची रिची बोनॉडविरुद्ध तुलनाही झाली. विशेष म्हणजे त्याची गोलंदाजीत दक्षिण ऑस्ट्रेलियासाठी सोबर्स यांच्याबरोबरील भागीदारी महत्त्वाची सिद्ध होत होती. त्यांनी एकत्र ११ वर्षांत पहिल्यांच शेफिल्ड शिल्ड ही ऑस्ट्रेलियातील मानाची देशांतर्गत स्पर्धाही जिंकली. त्यावेळी दक्षिण ऑस्ट्रेलियासाठी सोबर्स यांनी ५१ तर रेक्सने ४८ विकेट्स घेतल्या.

पुढे त्या मोसमात ऍडलेडला दक्षिण आफ्रिकन विरुद्ध खेळताना त्याने १२ धावा आणि २ विकेट्स घेतल्या. त्याला याच काळात दोन महत्त्वाचे मार्गदर्शक मिळाले एक म्हणजे चक्क डॉन ब्रॅडमन. ते त्यावेळी दक्षिण ऑस्ट्रेलियाचे निवडकर्ते होते. त्यांनी त्याला वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच दुसरा मार्गदर्शन म्हणजे त्याचा कर्णधार फॅवेल. त्यानेही त्याच्या गोलंदाजीत त्याला मदत केली.

रेक्सने ३१ वा सामना खेळताना गॅबा येथे कारकिर्दीत पहिल्यांदा आणि खरंतर शेवटचे सामन्यात १० विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्याने क्विन्सलँडविरुद्ध दोन्ही डावात प्रत्येकी ५ विकेट्स घेतल्या. याच सामन्यात इयान चॅपेल यांनी नाबाद २०५ धावांची खेळी केली होती. हे त्यांचे पहिले प्रथम श्रेणी द्विशतक होते.

रेक्ससाठी अखेर तो क्षण आला. त्याचा ऑस्ट्रेलियन संघात १९६४ ला ऍशेस मालिकेसाठी स्थान मिळाले. हा जहाजाने ऍशेससाठी जाणारा शेवटचा ऑस्ट्रेलियन संघ होता. पण त्याच्या संघातील निवडीवरुन बरेच वाद झाले. कारण त्याचा जन्म भारतातील होता आणि पासपोर्ट ब्रिटिश होता. त्यात त्याला बोटाला दुखापत झाल्या, ज्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. त्यामुळे त्याला कसोटी खेळण्याची संधी मिळाली नाही. पण त्याने यॉर्कशायरविरुद्ध सामना खेळाताना ३६ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या.

पण अखेर नंतर रेक्सला ऑस्ट्रेलियाकडून पदार्पणाची संधी मिळाली ती देखील जन्मदेशाविरुद्ध आणि जन्मदेशात. त्याने १९६४ला कोलकाता येथे इडन गार्डनवर कारकिर्दीतील पहिला आणि शेवटचा सामना खेळला. तो ऑस्ट्रेलियाकडून खेळणारा २३० वा कसोटीपटू ठरला. पण हा सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला १७४ धावांवर सर्वबाद केले होते. यात रेक्स शून्यावर बाद झाले होते. भारताने दिलिप सरदेसाई (४२), एमएस जयसिंह(५७) आणि चंदू बोर्डे(६८) यांच्या खेळीच्या जोरावर २३५ धावा केल्या. या डावात गोलंदाजीतही रेक्सला विकेट घेण्यात अपयश आले, त्याने ५ षटकात गोलंदाजी करताना १७ धावा दिल्या. पण या सामन्यात नंतर शेवटच्या २ दिवसात पाऊस झाल्याने सामना अनिर्णित राहिला.

पण यावेळी रेक्सच्या वडिलांचा एक शब्द मात्र खरा ठरला होता. झाले असे की जेव्हा विल्यम भारत सोडत होते तेव्हा त्यांच्या मित्रांनी त्यांना विचारले होते की भारतात परत कधी येणार, त्यावेळी ते म्हणाले होते ‘मला माहित नाही, पण तूम्ही माझ्या २ मुलांना भारतात ऑस्ट्रेलियाकडून खेळताना पहाल.’

विशेष म्हणजे त्यावेळी ब्रॅन्स्बी कुपरनंतर (१८४४ नंतर) रेक्स भारतात जन्मलेला आणि ऑस्ट्रेलियासाठी खेळणारा पहिला खेळाडू ठरला होता. तसेच ऑस्ट्रेलियासाठी कसोटी खेळणारा पहिला अँग्लो-इंडियन ठरला. पुढे रेक्सला दुखापतींचा सामना करावा लागला आणि त्याची कारकिर्द संपली.

त्याने १९५९ ते १९६७ पर्यंत ५३ प्रथम श्रेणी सामने खेळले. यात त्याने २ अर्धशतकांसह १०८९ धावा केल्या. त्याचे फलंदाजीतील सर्वोत्तम प्रदर्शन १९६६-६७ मध्ये पर्थमध्ये पश्चिम ऑस्ट्रेलियाविरुद्ध आले. त्या सामन्यात त्याने ८७ धावा केल्या होत्या. तसेच त्याने ५३ सामन्यात १२१ विकेट्सही घेतल्या. त्याचे ३६ धावांत ५ विकेट्स ही सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी होती.

त्याने नंतर दक्षिण ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनच्या उपअध्यक्षपद भुषवले. तसेच लेस फॅवेल क्रिकेट फाउंडेशनचे अध्यक्षपद आणि विश्वस्त म्हणूनही काम पाहिले. एवढेच नाही तर दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या निवड समीततही १९७९ ते १९८३ दरम्यान तो होता. तसेच ऍडलेड क्रिकेट क्लब, केन्सिंग्टन क्रिकेट क्बलसाठी प्रशिक्षकाची भूमिका निभावली. त्याला २००० मध्ये ऑस्ट्रेलिया स्पोर्ट्स मेडलनेही गौरविण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---