संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) आशिया चषकाची सुपर फोर फेरी खेळली जात आहे. सुपर फोरमधील दुसरा सामना परंपरागत प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान खेळला गेला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकत भारतीय संघाला प्रथम फलंदाजांसाठी आमंत्रित केले. भारतीय संघाला कर्णधार रोहित शर्मा व केएल राहुल यांनी आक्रमक अर्धशतकी सुरुवात दिली. आपल्या छोटेखानी खेळीत रोहितने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याचा एक विक्रम मात्र मोडीत काढला.
दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. सलामीला उतरलेल्या रोहित शर्मा व केएल राहुल यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत फलंदाजी न करता एकदम आक्रमक सुरुवात केली. रोहितने पहिल्या षटकात एक चौकार व एक षटकार ठोकला.
या सामन्यात कर्णधार रोहितने छोटी मात्र एक अत्यंत महत्त्वपूर्ण खेळी केली. हारिस रऊफच्या गोलंदाजीवर बाद होण्यापूर्वी रोहितने केवळ 11 चेंडूवर 3 चौकार व 2 षटकार लगावत 28 धावा केल्या. रोहित साखळी फेरीत फारशी चांगली कामगिरी करू शकला नव्हता.
आपल्या या छोट्याखानी खेळीत दुसरा षटकार मारताना रोहितने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याचा आशिया चषकात सर्वाधिक षटकार मारणारा कर्णधार म्हणून विक्रम आपल्या नावावर केला. आता रोहितच्या नावावर आशिया चषकात कर्णधार म्हणून 17 षटकार झाले आहेत. धोनीने आशिया चषकात भारताचे नेतृत्व करताना 16 षटकार ठोकले होते.
आशिया चषकातील एका खेळाडूने मारलेल्या सर्वाधिक षटकारांचा विचार केला गेला रोहित आता केवळ पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी याच्यापेक्षा मागे आहे.