भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमधील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला जोरदार प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या या संघात श्रेयस अय्यरला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. त्याला सुनील गावस्करांच्या हस्ते पदार्पणाची कॅप देण्यात आली.
क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी त्याला कसोटी पदार्पणाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच दिल्ली कॅपिटल्स संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रिकी पाँटिंग यांनी देखील त्याला ट्विट करत खास शुभेच्छा दिल्या आहेत.
रिकी पाँटिंग आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाला प्रशिक्षण देतात, त्यामुळे श्रेयस अय्यरचे यश पाहून त्यांना भरपूर आनंद झाला आहे. त्यांनी श्रेयस अय्यरला शुभेच्छा देताना लिहिले की, “गेल्या काही वर्षात तू जितकी मेहनत घेतली आहेस, ते पाहता तू यासाठी पात्र आहेस. ही तर सुरुवात आहे मित्रा, मला तुझा खूप अभिमान आहे.”
ही मालिका सुरू होण्यापूर्वी केएल राहुल दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर या दोन्ही खेळाडूंमध्ये पदार्पण करण्यासाठी स्पर्धा सुरू होती. पण अखेर हा सामना सुरू होण्याच्या एक दिवसापूर्वीच अजिंक्य रहाणेने स्पष्ट केले होते की, श्रेयस अय्यर या सामन्यात पदार्पण करणार आहे.
श्रेयस अय्यरने इथपर्यंत पोहचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. यावर्षी त्याला दुखापतीमुळे बराचकाळ संघांबाहेर व्हावे लागले होते. इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत क्षेत्ररक्षण करत असताना त्याला दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याला खांद्यावर शस्त्रक्रिया करावी लागली.
कानपूर कसोटीसाठी असे आहेत ११ जणांचे संघ –
भारत – शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव
न्यूझीलंड – टॉम लॅथम, विल यंग, केन विलियम्सन (कर्णधार), रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, टिम साउथी, एजाज पटेल, काइल जेमिसन, विल्यम सोमरविल
महत्त्वाच्या बातम्या –
“राहुल द्रविड टीम इंडियात आणेल स्थैर्य”, दिग्गज भारतीय क्रिकेटरला विश्वास
दर्जेदार! भारतात खेळताना न्यूझीलंडच्या फलंदाजांनी केलेली सर्वोत्तम ५ खेळी




