भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) काही दिवसांपूर्वी चांगलाच चर्चेत आला होता. श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत संधी न मिळाल्यामुळे त्याने नाराजी व्यक्त केली होती. तसेच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीं यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. या संपूर्ण प्रकरणानंतर आता अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने या वादावर मत मांडले आहे.
तामिळनाडूसाठी खेळणाऱ्या दिनेश कार्तिकच्या मते, संधी न मिळणे ही गोष्ट साहासाठी खूप कठीण असेल. कार्तिकच्या मते, आता रिषभ पंतने संघात स्थान पक्के केले आहे. आयसीसी रिव्यूमध्ये बोलताना कार्तिक म्हणाला की, “तुम्ही पाहू शकता की, रिषभ पंतने संघातील स्थान जवळपास पक्के केले आहे. त्यावरून समजू शकते की भारतीय संघ कोणत्या दिशेने पुढे चालला आहे. दुसऱ्या यष्टीरक्षक फलंदाजाची जरी जागा तयार झाली, तर एखाद्या नवीन खेळाडूलाच घेतले जाईल. मला समजते की, कोणताच क्रिकेटपटू या गोष्टीला स्वीकारू शकत नाही की, त्याला पुढे जाण्यास सांगितले जाते. हे खूप अवघड असते, कारण ते दिवस रात्र यासाठीच कष्ट करत असतात.”
कार्तिक पुढे बोलताना म्हणाला की, “आपल्या सर्वांचीच इच्छा आहे की, देशासाठी खेळावे. त्यामुळे जेव्हा कोणीतरी येऊन म्हणते, तुझी वेळ झाली आहे, तेव्हा हे मान्य करणे खूप कठीण असते. पण समजू शकतो. निवडर्ते, प्रशिक्षक आणि कर्णधार असे का म्हणत आहेत, हे समजून घेणेही गरजेचे आहे.”
पुढे बालताना कार्तिकने साहाचे कौतुकही केले. तो म्हणाला की, “मला वाटते की तो भारतीय क्रिकेटमधील उत्कृष्ट आणि शांत खेळाडूंपैकी एक आहे. तो अनेक वर्षांपासून संघासाठी काम करत आला आहे. तो अजूनही जगातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक आहे. मी त्याला सर्वोत्तम यष्टीरक्षक मानतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर काही शतकेही आहेत.” कार्तिक पुढे बोलताना म्हणाला की, “ज्याप्रकारे खूप वर्षांपूर्वी एमएस धोनी आला होता, त्याच प्रकारे रिषभ पंत आहे. जो दोन वर्षांपूर्वी आला आहे आणि चांगला खेळला आहे. ”
दरम्यान, श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेत संधी न मिळाल्यानंतर साहाने पत्रकार परिषदेत खुलासा केला होता की, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींकडून त्याला संधी मिळण्याविषयी शब्द दिला गेला होता. तर, दुसरीकडे प्रशिक्षक राहुल द्रविड त्याला निवृत्ती घेण्याविषयी विचार करायला सांगत आहे. साहाने असा प्रश्न उपस्थित केला होता की, गोष्टी एवढ्या लवकर कशा बदलू शकतात?
महत्वाच्या बातम्या –
आयपीएलनंतर केवळ २ टी२० सामन्यांसाठी ‘या’ देशाचा दौरा करणार टीम इंडिया
आर्यन पम्प्स एमएसएलटीए १५०००डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धा: भारताच्या झील देसाई हिला अग्रमानांकन
हिटमॅनच्या ताफ्यात ‘ड्रीम कार’! कोट्यवधींची किंमत तर, वापरणारे मोजकेच भारतीय