भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाने भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी रिषभ पंतबरोबर सध्या सुरु असलेल्या स्पर्धेबद्दल पहिल्यांदाच आपले मत व्यक्त केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात साहाच्या बंगाल संघाला विजय मिळविता आला नाही. या अंतिम सामन्यात पहिल्या डावात आघाडी घेतल्याने सौराष्ट्र संघाने रणजी ट्रॉफी पहिल्यांदाच जिंकली.
हा सामना खेळण्याआधी न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand vs India) कसोटी मालिकेत साहा (Wriddhiman Saha) भारतीय संघाचा भाग होता. परंतु त्याला एकाही सामन्यात 11 जणांच्या संघात सहभागी होण्याची संधी दिली नव्हती. भारताला या कसोटी मालिकेत 0-2च्या मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला.
या दोन्हीही सामन्यात साहाच्या जागी पंतला (Rishabh Pant) यष्टीरक्षण करण्याची संधी मिळाली. परंतु याबद्दल साहाने आपले मत मांडताना म्हटले की, कोण खेळतंय या गोष्टीमुळे फरक पडत नाही. कारण आपले अंतिम उद्दिष्ट हे भारताला सामना जिंकून देणे असते.
स्पोर्ट्सस्टारला दिलेल्या मुलाखतीत साहा म्हणाला की, “साधारणपणे जेव्हा फलंदाजी फळी निश्चित केली जाते तेव्हा प्रत्येक खेळाडूला सामन्यापूर्वीच संघाची माहिती असते. हे मला न्यूझीलंडला गेल्यावर समजले होते. हे काही कठीण नाही. कारण तुम्ही तेव्हाही संघाचा भाग असता.”
“आपल्याला वाटते की आपण संघातील 11 जणांमध्ये खेळले पाहिजे. परंतु आपल्याला संघ व्यवस्थापनाची परिस्थिती लक्षात घेऊन घेण्यात आलेले निर्णय स्विकारावे लागतात,” असे साहा म्हणाला.
“मी संघ निर्णयांना पुढे आणि वैयक्तिक गोष्टींना मागे ठेवतो. जर संघाने निर्णय घेतला आहे की पंतने खेळले पाहिजे तर, मी याच्याशी सहमत आहे. कारण मला असे वाटते की संघाचा विजय झाला पाहिजे,” असे आपले मत मांडताना साहा म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
– भारताला पुढील आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी बघावी लागणार ३ महिने वाट…
– जाणून घ्या १४३ वर्षांचा कसोटी क्रिकेटचा इतिहास
– बचपन के यार, सौराष्ट्राच्या विजयाचे शिल्पकार