मुंबई | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० तसेच वनडे मालिकेसाठी काल भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यात माजी कर्णधार एमएस धोनीचा यष्टीरक्षक म्हणून अपेक्षेप्रमाणे सर्वच सामन्यांत समावेश करण्यात आला.
दुसऱ्या बाजूला दिनेश कार्तिकला मात्र वगळण्यात आले. तसेच न्यूझीलंड दौऱ्यात वनडे संघात नसलेल्या रिषभ पंतचा संघात समावेश करण्यात आला.
विंडीजचा संघ जेव्हा २०१८मध्ये भारत दौऱ्यावर आला होता तेव्हा याच दौऱ्यात वनडेत पंतने पदार्पण केले होते. या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात संधी दिल्यानंतर त्याला आजपर्यंत टीम इंडियात वनडेसाठी संधी देण्यात आली नव्हती.
दुसऱ्या बाजूला यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला मात्र वारंवार संघव्यवस्थापनाने संधी दिली. तसेच कार्तिकनेही आपली उपयुक्तता काही प्रमाणात सिद्धदेखील केली होती.
माजी कर्णधार एमएस धोनीला संघव्यवस्थापन २०१९ विश्वचषकात १००% यष्टीरक्षकाची जबाबदारी देणार असल्यामुळे कार्तिक आणि पंतपैकी एकाची राखीव यष्टीरक्षक म्हणून निवड होणार आहे.
असे असताना काल ऑस्ट्रेलियासाठी संघनिवड करताना कार्तिकला डच्चू देऊन पंतला घेणे कितपत योग्य हे निवडसमितीलाच ठाऊक. एकतर जो खेळाडू संपुर्ण कारकिर्दीत ३ वनडे सामने खेळलाय त्याला विश्वचषकापुर्वी केवळ एका वनडे मालिकेत संधी द्यायची. त्यातही त्याला किती सामने खेळायला मिळेल कुणालाही माहित नाही.
दुसऱ्या बाजूला कार्तिकला १ जानेवारी २०१८पासून १२ सामने खेळवायचे आणि पुन्हा घरी पाठवण्याचा निर्णय़ संघव्यवस्थापनाने का घेतला कुणास ठावुक?
केवळ फलंदाजीच्या आकडेवारीतच पहायचे म्हटलं तर दिनेश कार्तिक हा धोनी आणि पंतला १ जानेवारी २०१८ पासून नक्कीच सरस ठरला आहे.
त्याने १२ सामन्यात खेळताना ४०.३३च्या सरासरीने २४२ धावा केल्या आहेत. त्यात त्याच्या १ अर्धशतकाचा समावेश आहे. परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्धची ती एक न घेतलेली धाव त्याला भलतीच महागात पडली असेच म्हणावे लागेल.
दुसऱ्या बाजूला पंत कारकिर्दीत केवळ तीन वनडे सामने खेळला असून शेवटचा सामना २७ ऑक्टोबर २०१८ रोजी खेळला आहे. या ३ सामन्यात त्याने २०.५०च्या सरासरीने ४१ धावा केल्या आहेत. याच कालावधीमध्ये पंतने कसोटी क्रिकेटमध्ये केलेली कामगिरीच त्याच्या संघातील निवडीसाठी कारणीभूत ठरली असेच वाटते.
तर एमएस धोनीने १ जानेवारी २०१८पासून तब्बल २६ सामने खेळले आहेत. भारतीय संघात या कालावधीत सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत धोनी शिखर धवन (२७) आणि रोहित शर्मा (२७) पाठोपाठ तिसऱ्या स्थानी आहे.
जरी धोनीने खालच्या क्रमांकावर फलंदाजी केली असली तरीही बॅटने या काळात त्याला विशेष चमक दाखवता आलेली नाही. अपवाद फक्त ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेचा.
या २६ सामन्यात त्याने ३९.७६च्या सरासरीने ५१७ धावा केल्या आहेत. त्यात त्याच्या ३ अर्धशतकांचा समावेश आहे.
काल जेव्हा दिनेश कार्तिकला संघातून वगळताना पंतला संधी देण्यात आली तेव्हा निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी कोणतेही ठोस कारण दिले नाही.
अशीच काहीशी परिस्थीती केएल राहुलला अजिंक्य रहाणेऐवजी संघात स्थान देतानाही झाली असेच म्हणावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
–टीम इंडियाची घोषणा, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा आहे १५ जणांचा चमू