भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतसोबत हरियाणाच्या एका क्रिकेटपटूने फसवणूक केली आहे. या खेळाडूने पंतला १ कोटी ५० लाखापेक्षा अधिक रकमेची टोपी टाकली आहे. हरियाणाच्या या खेळाडूचे नाव मृणांक सिंग आहे. मृणांकला चालू महिन्याच्या सुरुवातीला पोलिसांनी एका दुसऱ्या प्रकरणात अटक केली आहे. अशातच त्याने पंतसोबत देखील फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
रिषभ पंत (Rishabh Pant) आणि त्याचा मॅनेजर पुनीत सोलंकी यांनी मृणांक सिंग (Mrinank Singh) याच्या विरोधात फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे. आर्थर रोड पोलीस स्टेशनमध्ये मृणांकसाठी दिल्लीच्या एका न्यायालयात हजर राहण्यासाठी नोटस देखील आली आहे. चालू महिन्याच्या सुरुवातीला मृणांकला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने एका व्यापाऱ्याला महागडी घड्याळे आणि मोबाईल फोन स्वस्तात देतो, असे म्हणून फसवण्याचा प्रयत्न केला होता. याच प्रकरणात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले हेते. आता मृणांकने पंतसोबत देखील अशाच प्रकारे फसवणूक करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती समोर आली आहे.
पंतने या खेळाडूच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पंतच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात बाउंस चेकच्या माध्यमातून त्यांच्यासोबत १ कोटी ६३ लाख रुपयांची फसवणूक झाली. साकेत न्यायालयाने मागच्या आठवड्यात मुंबईच्या आर्थर रोड पोलीस स्टेशनला मृणांक सिंगला हजर करण्यासाठी नोटीस पाठवली होती. या महिन्याच्या सुरुवातीला मृणांकला जुहू पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी त्याने शहरातील एका व्यापाऱ्यासोबत ६ लाख रुपयांची फसवणूक केली होती.
अशी माहिती मिळाली आहे की, पंतला फ्रंक मुलर वॅनगार्ड याचिंग या सीरिजचे घड्याळ खरेदी करायचे होते आणि त्याने यासाठी ३४,२५,१२० रुपये मृणांककडे दिले होते. तसेच रिचर्ड मिल ब्रँडचे एक घड्याळ घेण्यासाठी पंतने ६२,६०,००० रुपये देखील त्याच्याकडे दिले होते.
मृणांकने पंतचा मॅनेजर सोलंकीला असे सांगितले होते की, तो महागडी घड्याळे स्वस्तात खरेदी करू शकतो. माध्यमांतील वृत्तानुसार पंतने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, त्याला मृणांक सिंगने धोका दिला आहे आणि खोटा शब्दही दिला होता. तक्रारीमध्ये घड्याळांच्या किमतीबाबत देखील माहिती दिली गेली आहे.