इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ चे प्लेऑफ सामने जवळ येत आहेत. त्यामुळे सर्व संघ प्लेऑफमध्ये धडक मारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत. अशात सोमवार रोजी (०४ ऑक्टोबर) गुणतालिकेत पहिल्या २ स्थानांवर दबदबा बनवून असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात हंगामातील ५० वा सामना झाला. दुबई येथे झालेल्या या सामन्यात दिल्लीने अंतिम षटकात ३ विकेट्सने बाजी मारली. दरम्यान दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत फलंदाजीत विशेष कामगिरी करू शकला नाही. परंतु त्याने आपल्या छोटेखानी खेळीदरम्यान एक मोठा विक्रम केला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई संघाने दिल्लीला १३७ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पंत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. तो फलंदाजीला आल्यानंतर संघ ५१ धावांवर २ विकेट्स अशा स्थितीत होता. त्यामुळे पंतकडून संघाला कर्णधार खेळीची अपेक्षा होती. पंतनेही आक्रमक पवित्रा घेत १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने झटपट खेळी केली. परंतु अवघ्या १५ धावांवर रविंद्र जडेजाने त्याला पव्हेलियनचा रस्ता दाखवला.
या खेळीदरम्यान त्याने मारलेला एकच पण जबरदस्त षटकार त्याच्यासाठी विक्रमी ठरला. या षटकारासह त्याने यष्टीरक्षक फलंदाजाच्या रुपात आयपीएलमधील आपले १०५ षटकार पूर्ण केले आहेत. याबाबतीत त्याने पंजाब किंग्जचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलची बरोबरी केली आहे. आता त्याच्यापुढे फक्त चेन्नईचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी आहे. धोनी २१३ षटकारांसह या यादीत अव्वलस्थानी विराजमान आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे यष्टीरक्षक
२१३ : महेंद्र सिंह धोनी
१०५ : रिषभ पंत
१०५ : केएल राहुल
१०३ : दिनेश कार्तिक
९९ : रॉबिन उथप्पा
महत्त्वाच्या बातम्या-
उथप्पाचा चेंडू पकडण्यासाठी नॉन स्ट्राईकरपर्यंत धावला यष्टीरक्षक पंत; अश्विनही म्हणे, ‘असं का करतोय?’
तो सर जडेजा आहे! दोन वेळेस जीवनदान मिळूनही जड्डूने ‘अशी’ काढली पंतची विकेट, पाहा व्हिडिओ
किती गोड! वडीलांचा संघ जिंकावा म्हणून लेक झिवाची देवाकडे प्रार्थना, क्यूट क्षणाकडे नेटकरी आकर्षित






