भारताचा वरिष्ठ क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाने मायदेशी परतण्यापेक्षा इंग्लंडमध्ये राहून आगामी कसोटी मालिकेसाठी तयारी करण्याचा निर्णय घेतला होता. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका ४ ऑगस्टपासून खेळवली जाईल. तत्पूर्वी, भारताचा माजी यष्टीरक्षक पार्थिव पटेल याने इंग्लंड दौऱ्यावर भारताचा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक असलेल्या रिषभ पंतची तोंडभरून स्तुती केली आहे.
पार्थिवने केली रिषभची स्तुती
भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक व सध्या समालोचक असलेला पार्थिव पटेल एका कार्यक्रमात बोलताना रिषभ पंतविषयी म्हणाला, “रिषभ पंत भारतीय क्रिकेटचे भविष्य आहे. तो अत्यंत निडर असून, नेहमी काही तरी नवीन शिकण्याची त्याची तयारी असते. २०१८-२०१९ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मी राखीव यष्टीरक्षक, तर तो मुख्य यष्टीरक्षक होता. तो नेहमी माझ्याकडून यष्टीरक्षणाबाबत मार्गदर्शन घ्यायचा. रिषभ यष्टीरक्षणावर मेहनत घेत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. कारण, घरच्या मैदानावर फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर त्याने इंग्लंडविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली.”
पार्थिव पटेल याने त्याच्या फलंदाजीविषयी बोलताना म्हटले, “फलंदाजी करताना तो अधिक जबाबदारी घेत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने काही मॅच विनिंग खेळ्या केल्या आहेत. हीच गोष्ट त्याला क्रिकेटपटू म्हणून मोठी बनवते.” याच मुलाखतीत पार्थिव यांनी इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाला शुभेच्छा देखील दिल्या.
कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता रिषभ
तेवीस वर्षीय रिषभ पंत काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाला १३ जुलैपर्यंत पर्यटनास परवानगी देण्यात आलेली. या काळात रिषभने युरो कप २०२० च्या काही सामन्यांना हजेरी लावलेली. त्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झालेले. आता मात्र तो यातून बरा झाला असून २२ जुलै रोजी तो संघामध्ये सामील होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
द्रविडच्या ‘या’ मास्टरस्ट्रोकमुळे भारतीय संघाने मिळवला विजय, भुवनेश्वर कुमारने केला खुलासा
दुखापतीतून सावरताच विराट कोहलीने सुरु केला सराव; ताबडतोड शॉट्स खेळताना दिसला कर्णधार, पाहा व्हिडिओ
जो धोनी, गांगुलीलाही जमला नाही तो विक्रम करण्याची शिखर धवनला आहे सुवर्णसंधी






