भारतीय टी२० संघ सध्या आगामी टी२० विश्वचषक २०२६च्या तयारीत व्यस्त आहे. २०२४मध्ये भारताने जेव्हा टी२० विश्वचषक जिंकला, तेव्हा भारताचा स्टार विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंतही त्याचा भाग होता. आता मात्र तो दुखापतीमुळे राष्ट्रीय संघाच्या बाहेर आहे. तो दुखापतीतून सावरत असून त्याने लवकरच मैदानात परतण्याचे संकेत दिले आहे. त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेआधी दुखापत झाली होती.
रिषभ सध्या बेंगलोरमधील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सेंटर ऑफ एक्लिलेंसमध्ये प्रचंड मेहनत करत दुखापतीतून सावरत आहे. त्याला थ्रोडाऊन स्पेशालिस्टचा चेंडू कमरेला लागला होता. त्यामुळे त्याला साईड स्ट्रेनची दुखापत झाली होती. त्याने मुंबईत पार पडलेल्या पिकलबॉल लीगदरम्यान त्याच्या फिटनेसची माहिती दिली आहे.
पंत म्हणाला, “दिवसागणिक माझी फिटनेस उत्तम होत आहे. मी त्यासाठी बेंगलोरच्या सेंटर ऑफ एक्सिलेंसमध्ये सराव करत आहे. त्यामुळे मी लवकरच मैदानात परतणार आहे.”
“जेव्हा मी दुखापतग्रस्त होतो, तेव्हा खेळाविषयीचे प्रेम आणि जवळपासच्या लोकांची मिळालेली साथ यामुळे मी लवकर ठिक होत आहे. जेव्हा आपले खेळावर प्रेम असते तेव्हा त्याच्यापासून दूर राहणे अवघड होते”, असेही पंतने म्हटले.
पंतने अनेकदा मोठ-मोठ्या दुखापतीतून सावरत जबरदस्त संघपुनरागमन केले आहे. त्याबाबतही त्याने त्याचे मत व्यक्त केले. “दुखापतीतून पुनपुन्हा सावरल्याने जीवनाला एक वेगळे वळण मिळाले आहे. त्यासाठी महत्वाच्या स्पर्धांपासून दूर राहणे कठीण होते. मात्र प्रत्येक पुनरागमनाने मला खूप काही शिकवले आहे. त्या स्पर्धांमध्ये खेळण्याला मी खूपच मिस करतो आहे”, असेही पंतने पुढे म्हटले.
पंतने टी२० बरोबरच भारताच्या कसोटी संघातही असताना महत्वाच्या खेळी केल्या आहेत. त्याला दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेलाही मुकावे लागले होते. आता त्याने केलेल्या वक्तव्यामुळे चाहत्यांना लवकरच त्याचा खेळ मैदानात दिसणार आहे.






