चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चालू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाहुण्या इंग्लंडचा पहिला डाव ५७८ धावांवर आटोपल्यावर भारतीय संघाची खराब सुरुवात झाली. चहापानापर्यंत इंग्लंडने शंभर धावसंख्येच्या आत भारताच्या चार फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर खालच्या फळीत फलंदाजीला आलेला यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने आक्रमक खेळी केली. परंतु अवघ्या ९ धावांनी त्याचे शतक हुकले.
सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पंतने १०३.४१ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करत ९१ धावा चोपल्या. या खेळीसाठी त्याने ८८ चेंडू खेळले आणि ५ षटकार व ९ चौकार मारले. अखेर ५६.४ षटकात इंग्लंडचा गोलंदाज डोम बेसने जॅक लीचच्या हातून त्याला झेलबाद केले.
महत्त्वाचे म्हणजे, मायभूमीत कसोटी क्रिकेट खेळताना ९०-९९ धावांमध्ये बाद होण्याची ही पंतची पहिली वेळ नव्हती. यापुर्वी २ वेळा तो अशाचप्रकारे शतकाच्या जवळ पोहोचून बाद झाला आहे. २०१८ मध्ये राजकोट येथे वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात तो ९२ धावांवर बाद झाला होता. तर त्याचवर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध हैदराबाद येथे झालेल्या सामन्यातही अवघ्या ८ धावांनी त्याचे शतक हुकले होते.
याबरोबरच मायदेशाबाहेरही पंत एकदा ९०-९९ धावांवर बाद झाला आहे. जानेवारी २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे झालेल्या कसोटी सामन्यात तो ९७ धावांवर पव्हेलियनला परतला होता. यासह पंत हा कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल ४ वेळा ९०-९१ धावांवर बाद होणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. ऑगस्ट २०१८ नंतर म्हणजेच पंतच्या कसोटी पदार्पणानंतर आजवर इतर फलंदाज जास्तीत-जास्त २ वेळा या धावसंख्येवर बाद झाले आहेत.
रिषभ पंत ९०-९९ धावांवर बाद झालेले प्रसंग
९२ धावा- वेस्ट इंडिज (२०१८, राजकोट)
९२ धावा- वेस्ट इंडिज (२०१८, हैदराबाद)
९७ धावा- ऑस्ट्रेलिया (२०२१, सिडनी)
९१ धावा- इंग्लंड (२०२१, चेन्नई)
महत्त्वाच्या बातम्या-
INDvENG Test Live : पंतचे शतक थोडक्यात हुकले, ९१ धावांवर झाला बाद; भारत अजून ३५३ धावांनी पिछाडीवर
रिषभमध्ये लपलाय मोठा लेखक! चेन्नई कसोटीतील पंतची मजेदार वाक्ये वाचून तुम्हीही असंच म्हणाल
एक असा दर्शक, जो कसोटीतील दोन्ही १० विकेट हॉलचा साक्षीदार ठरला