युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक सध्या चर्चेत आले. आयपीएल २०२२मध्ये त्याच्या गोलंदाजीची धार पाहून निवडकर्त्यांनी त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात निवडले. आता चाहत्यांना त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची प्रतिक्षा आहे. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत या मालिकेत भारताचे नेतृत्व करणार आहे. अशात पंतने उमरानच्या पदार्पणाविषयी महत्वाचे संकेत दिले आहेत.
उमरान मलिक (Umran Malik) याने आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी जबरदस्त गोलंदाजी करून दाखवली. त्याने खेळलेल्या १४ सामन्यांमध्ये २२ विकेट्स घेतल्या. हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांमध्ये त्याचे नाव चौथ्या क्रमांकावर होते. यादरम्यान एका सामन्यात त्याने तब्बल १५७ किमी ताशी वेगाने चेंडू टकला, जो हंगामातील दुसरा सर्वात वेगवान चेंडू ठरला. याच प्रदर्शनाच्या जोरावर त्याने पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान मिळवले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिका सुरू होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी (८ जून) पत्रकार परिषदेत रिषभ पंत (Rishabh Pant) उमरानविषयी बोलला. पंत म्हणाला की, “तो आमच्यासाठी एक अद्भुत शक्यता आहे, पण जसजसा वेळ जात आहे, तसा तो शिकेल की, स्वतःच्या लाईन आणि लेंथवर कसे नियंत्रण मिळवायचे. त्याने आयपीएलमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे, पण मला वाटते पुढे आपण त्याला भारतीय संघात यशस्वी होताना पाहू. परंतु मला असेही वाटते की, यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे जोपर्यंत आपण एका संघाच्या रूपात विचार करत आहोत, तर जे खेळाडू आधीपासून आहेत, आपण त्यांना लवकर संधी देण्याचा प्रयत्न करूयात.”
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे, जे पंतचे होम ग्राउंड आहे. याठिकाणी भारताचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यामुळे पंत देखील खुश आहे. तो म्हणाला की, “हा खूप चांगला अनुभव आहे. खासकरून जेव्हा तुम्हाला तुमच्या गावी संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळत आहे. आयपीएलमधील कर्णधारपदाचा अनुभव माझ्या खूप कामी येईल.”
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेत रोहित शर्मा अनुपस्थित असल्यामुळे केएल राहुलकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली गेली होती, पण सराव सत्रात राहुलला दुखापत झाल्याचे समजले आणि याच कारणास्तव त्याने देखील संपूर्ण मालिकेतून माघार घेतली. अशात रिषभ पंत कर्णधाराच्या रूपात भारतीय संघासाठी कसे प्रदर्शन करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आरसीबीच्या वेगवान गोलंदाजाचे रणजी ट्रॉफीत विक्रमी अर्धशतक, ‘एवढ्या’ चेंडूत ठोकली फिफ्टी
‘…म्हणून त्यादिवशी विराट कोहली रडला होता,’ संघ सहकाऱ्याचे स्पष्टीकरण
उमरान की अर्शदीप, कोणाला द्यावी संधी?, भारताच्या माजी प्रशिक्षकाचा पंतला सल्ला