विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौर्यावर असून, तेथे त्यांना इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. तत्पूर्वी, मालिका सुरू होण्याआधी संघाला चांगली बातमी मिळालीये. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचा क्वारंटाईन कालावधी संपला असून, तो लवकरच संघात सामील होऊ शकेल. अलीकडे, तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. या मालिकेतील पहिला सामना ४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
पंत आढळला होता कोरोना पॉझिटिव्ह
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर सर्व खेळाडूंना २० दिवसांचा ब्रेक देण्यात आलेला. या दरम्यान, पंत व्यतिरिक्त थ्रोडाउन तज्ञ दयानंद गिरानी देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.
एका प्रमुख क्रीडा संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, पंतचा क्वारंटाईन कालावधी रविवारी संपला. मात्र, २१ जुलैपूर्वी तो संघात सामील होऊ शकणार नाही. तो २२ किंवा २३ तारखेला डरहॅम येथे संघात सामील होईल. अशा परिस्थितीत तो २७ जूनपासून होणाऱ्या दुसर्या सराव सामन्यात भाग घेऊ शकेल. भारत आपला पहिला सराव सामना मंगळवारपासून (२० जुलै) डरहॅममध्ये सेलेक्ट काउंटी इलेव्हन विरुद्ध खेळणार आहे. केएल राहुल या सामन्यात यष्टीरक्षक म्हणून खेळेल.
इतर सदस्य राहणार आणखी काही काळ क्वारंटाईन
अभिमन्यू ईस्वरन, वृद्धिमान साहा आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण हे दयानंद गिरानी यांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांनादेखील क्वारंटाईन करण्यात आलेले. मिळालेल्या माहितीनुसार, अभिमन्यू,न साहा आणि भरत अरुण यांचा क्वारंटाईन कालावधी २४ जुलै रोजी संपेल. या तिघांचा कोरोना अहवाल नकारात्मक आला आहे. मात्र, गिरानी आणखी काही काळ अलिप्त राहतील.
चार ऑगस्टपासून सुरू होणार मालिका
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचा श्रीगणेशा इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळून करेल. संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा, उपकर्णधार अजिंक्य रहाणे व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या फॉर्मात नसलेल्या खेळाडूंवर सर्वांची खास नजर असेल. यानंतर सर्व खेळाडू आयपीएलचा हंगाम खेळण्यासाठी युएईला रवाना होतील.
महत्त्वाच्या बातम्या –
‘पहिल्या ५.३ षटकात आमचा जलवा होता’, शॉच्या खेळीनंतर सेहवागचे ‘त्या’ खास फोटोसह मजेदार ट्विट
“युवा खेळाडूंवर शतक करण्याचा दबाव टाकू नये”, माजी भारतीय क्रिकेटर गरजला
“तो मला विरेंद्र सेहवागची आठवण करुन देतो”, श्रीलंकन दिग्गजाने केली भारताच्या युवा खेळाडूचे कौतुक